मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांना ‘चिरीमिरीची तहान’ असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:33+5:302021-03-21T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधीच व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या उत्पादकांनी भारतीय मानक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधीच व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या उत्पादकांनी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. हे अधिकारी चिरीमिरीसाठी वेठीस धरत असल्याचे सांगत बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भारतीय मानक ब्युरो अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध ३ मार्चला ब्युरोच्या पुणे कार्यालयात आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या सदस्यांच्या व्यवसायाचे मानक परवाने रद्द करण्याच्या नोटिसा अधिकारी हेमंत आडे यांनी बजावल्या आहेत, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. या द्वेषमूलक कारवाईविरुद्ध न्यायालयात जाण्याबरोबरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, पुणे बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पत्रकाद्वारे दिला आहे.
भारतीय मानक ब्युरोच्या पुणे विभागातील १४ जिल्ह्यात ५०० लायसनधारक आहेत. भारतीय मानक ब्युरोचे पुण्यातील प्रमुख हेमंत आडे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांना १० मार्चला वैयक्तिक आकसातून तसेच नियमबाह्य पद्धतीने नोटिसा देण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल, उपाध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. भारतीय मानक ब्युरो चे अधिकारी भ्रष्टाचार करीत असून त्याविषयी तक्रारी केल्याने चिडून जाऊन नोटिसांची कारवाई करीत आहेत, असा संघटनेचा आरोप आहे.
चौकट
‘चोराला सोडून संन्याशाला फाशी’
भारतीय मानक ब्युरोचे खोटी स्टिकर लावून ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ विकले जात असल्याच्या आणि त्याविरुद्ध कारवाई करण्याच्या तक्रारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार केल्या. अनाधिकृत स्टिकर वापरकर्त्यांची यादी दिली. त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी हेमंत आडे हे परवाना धारक व्यावसायिकांना उलट नोटीस बजावत आहेत आणि परवाने रद्द करण्याची धमकी देत आहेत, असा संघटनेचा आरोप आहे.
चौकट
संघटना सर्वोच्च न्यायालयात
बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने याआधीच सर्वोच्च न्यायालयात जाऊन अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती प्रकल्पांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश प्राप्त केलेले आहेत. अनधिकृत आयएसआय स्टिकर वापरणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात आघाडी उघडली आहे, असा दावा संघटनेने केला आहे.