कंपनीत नोकरशाहीची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 03:02 AM2017-07-25T03:02:30+5:302017-07-25T03:02:30+5:30

स्मार्ट सिटी कंपनीत नोकरशाहीची मनमानी सुरू असल्याचा आरोप संचालक मंडळातील पदसिद्ध संचालक, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला.

The bureaucracy's arbitrariness in the company | कंपनीत नोकरशाहीची मनमानी

कंपनीत नोकरशाहीची मनमानी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्मार्ट सिटी कंपनीत नोकरशाहीची मनमानी सुरू असल्याचा आरोप संचालक मंडळातील पदसिद्ध संचालक, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला. माध्यमांशी बोलू नका, सरकारी कंपनीचा दर्जा नसल्याबाबत काहीही मत व्यक्त करू नका, या सगळ्या फतव्यांना २७ जुलैच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तीव्र विरोध करणार असल्याचे तुपे यांनी सांगितले. अन्य संचालकही याला साथ देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक मंडळात नोकरशाहीचाच भरणा जास्त आहे. त्यांचे बहुमत असल्यामुळे ते लोकनियुक्त संचालकांना विचारायला तयार नाहीत. संचालक मंडळात महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते व ज्यांना प्रतिनिधित्व मिळाले नाही अशा राजकीय पक्षांचे दोन प्रतिनिधी असे एकूण ६ लोकनियुक्त संचालक आहेत. अन्य ९ संचालक नोकरशाहीतील आहेत. त्यांचीच मनमानी या कंपनीत सुरू आहे. कंपनी स्वतंत्र असली तरी ती महापालिकेमधूनच स्थापन झाली आहे व महापालिकेच्याच मालमत्तेवर वाढणार आहे, याकडे नोकरशाही दुर्लक्ष करीत असल्याचे आता स्पष्ट होत आहे, असे मत तुपे यांनी व्यक्त केले.
माध्यमांशी बोलण्यास संचालकांना मनाई करणे हा तर लोकशाहीवर घालाच आहे. विषयपत्रिकेवर अधिकृतपणे हा विषय आणला जातो, यावरूनच नोकरशाही कशी मनमानी करते आहे ते दिसते. पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कंपनीतील संचालक मंडळांनी याचा तीव्र विरोध करणे अपेक्षित आहे.
आपण तर त्याला विरोध करणारच आहोत, महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष या पदसिद्ध संचालकांनीही विरोध करावा, असे तुपे म्हणाले. याशिवाय अन्य अनेक अनिष्ट गोष्टी नोकरशाहीकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विषयपत्रिका संचालक मंडळ बैठकीच्या केवळ काहीच दिवस आधी देणे, आवश्यक असलेली माहिती लोकनियुक्त संचालकांना न देणे, त्यांना विश्वासात न घेता निर्णय प्रक्रिया राबविणे अशा अनेक गोष्टी कंपनीत होत आहेत.
२७ जुलैला बैठक होत आहे. तुपे यांच्या भूमिकेमुळे ही बैठक वादग्रस्त होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: The bureaucracy's arbitrariness in the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.