हायप्रोफाईल एरियामध्ये घरफोडी करणारा रॉबिनहुड जेरबंद; आंतरराज्य गुंडाला पंजाबमधून अटक
By विवेक भुसे | Published: February 25, 2023 10:11 PM2023-02-25T22:11:00+5:302023-02-25T22:12:16+5:30
१२ राज्यात ४० गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महागड्या गाडीतून येऊन बाणेर रोडवरील सिंध सोसायटीत घरफोडी करणार्या आंतरराज्यीय गुन्हे करणार्या टोळीतील म्होरक्याला गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमधील जालंधर येथून अटक केली. त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून १ कोटी २१ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
माेहम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबीन हुड (वय ३३, रा. जोगिया, पुपरी, जि. सातमाढी, बिहार), शमीम शेख (वय ३४, रा. बिहार), अब्रार शेख (वय २५) आणि राजू म्हात्रे (वय ५५, दोघे रा. धारावी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिंध सोसायटीतील हॉलच्या खिडकीचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील कपाटातून परदेशी बनावटीचे पिस्टल व जिंवत काडतुसे, ३ किंमती घड्याळे, ४ तोळे सोन्याची चैन व २ लाख रुपये असा ऐवज चोरून नेला होता. पिस्टल चोरीला गेल्याने त्यांच्याकडून अजून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी ३ पथके तयार केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एक संशयित जग्वार कार चोरट्यांनी वापरल्याचे आढळून आले. त्या कारचा नंबर बनावट होता. कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाशिकपर्यंत २०० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात जग्वार कारचा मुळ नंबर आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ८ दिवस पाळत ठेवून त्याला जालंधरमधून अटक केली. त्याच्याकडून जग्वार कार, पिस्टल जप्त केले. त्याने सुनिल यादव, पूनित यादव, राजेश यादव (सर्व रा. गाजियाबाद) यांच्यासाथीने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
चोरलेली घड्याळे मुंबईतील शमीम शेखकडे दिल्याचे समजल्यावर त्यांना अटक करुन त्यांच्याकडून पुण्यातील ३ आणि विशाखापट्टमण येथील घरफोडीतील ७ किंमती घड्याळे जप्त केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल पवार, नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार अस्लम अत्तार, हरीष मोरे, प्रवीण भालचिम, राजेंद्र लांडगे, विनोद महाजन, अशोक शेलार, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, वैभव रणपिसे यांच्या पथकाने केली.
मंत्री, राज्यपाल, न्यायाधीशांकडे घरफोडी
मोहम्मद उर्फ रॉबिनहूड हा श्रीमंत वस्तीमधील बंगल्यांमध्येच चोरी करायचा. देशातील विविध शहरांमध्ये हाय प्रोफाईल बंगलो, पाॅश सोसायटी इन सिटी असे गुगल सर्च करुन त्या ठिकाणी महागड्या गाडीतून फिरुन तो रेकी करुन चोरी करत असे. प्रत्येक वेळी तो वेगवेगळे साथीदार घेत असे. अनेकांच्या घरातून त्याने अगदी कोट्यावधींची चोरी केली. गेल्या वर्षी त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याचा हा प्रताप समोर आला होता.
बिगारी कामगार म्हणून वेषांतर
मोहम्मद उजाला याला पोलिसांची जराशी चाहुल लागताच तो पसार होत असे. त्यामुळे जालंधरला तो रहात असलेल्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचे पाहून पोलिसांनी बिगारी कामगारांचे वेषांतर करुन घराजवळ ८ दिवस सापळा रचून त्याला पकडले.
पत्नी जिल्हा परिषद सदस्य
चोरीच्या पैशातून त्याने मुळ बिहारमधील जोगिया गावात अनेक सामाजिक कामे केली. रस्ता, दिवे आणि नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याने स्थानिक नागरिकांनीच त्याला रॉबिनहुड असे नाव दिले. गावात त्याने ७ कोटींची कामे केल्याचे सांगितले जाते. त्याच्या जोरावर त्याची पत्नी परवीन गुलशन ही जिल्हा परिषदेत निवडून आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"