सराईत घरफोड्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 AM2021-03-20T04:09:58+5:302021-03-20T04:09:58+5:30
पुणे : रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून ९ लाख ५० हजार रूपये किमतीच्या ...
पुणे : रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून ९ लाख ५० हजार रूपये किमतीच्या घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. त्याच्याकडून १९० ग्रॅम सोने आणि १०० ग्रॅम चांदीचे दागिने गुन्ह्यातील दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्यावर यापूर्वी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४९ गुन्हे दाखल आहेत.
मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना (वय २४, रा. सुतारदरा, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मित्रमंडळ चौक येथे राहाणाऱ्या मिहिर भागवत यांच्या घरी २५ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या ८ लाख रूपयांची घरफोडी झाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तीन पथके तयार करून घरफोडी उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार आणि त्यांच्या स्टाफने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून हा गुन्हेगार मुकेश बबन मुने असल्याचे निष्पन्न झाले. हा आरोपी पनवेल, खोपोली, नगर आदी विविध ठिकाणे बदलत पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस अंमलदार अमित सुर्वे आणि राहुल ओलेकर यांना हा आरोपी सहकारनगर येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने पकडले. त्याने मित्रमंडळ चौकातील घरफोडीची माहिती दिली. घरफोडीतील दागिने अहमदनगरच्या सराफाकडे विकले असल्याची कबुली दिली. सराफ राजन मिसाळ (वय ५३, लक्ष्मीनारायण भवन, अहमदनगर) याला देखील अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार ,पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, महेश गाढवे, नवनाथ क्षीरसागर, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे आणि प्रमोद भोसले यांनी केली आहे.
------------------------------------