घरफोडे, दुचाकी चोर गजाआड

By admin | Published: October 12, 2016 02:34 AM2016-10-12T02:34:48+5:302016-10-12T02:34:48+5:30

घरफोडी करण्यासाठी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल

Burglars, two-wheeled thieves | घरफोडे, दुचाकी चोर गजाआड

घरफोडे, दुचाकी चोर गजाआड

Next

नारायणगाव : घरफोडी करण्यासाठी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण सुमारे ५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
घरफोडी व मोटारसायकलचोरी प्रकरणी टोळीतील अमित ठमा भुतांबरे (वय १९), रवींद्र बबन कडाळे (वय २२, दोघे रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. भोरवाडी येथील रामदास बाबूराव गुंजाळ यांच्या रहात्या घरासमोरून मागच्या महिन्यात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल चोरून नेली होती. तसेच, त्याच वेळी शेजारी राहणारे भगवंत शिदे यांच्या घरातदेखील घरफोडी करून मोबाईल व रोख रक्कमेची चोरी झाली होती. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ नंबर, येडगाव, भोरवाडी, निमगाव सावा, पारगाव या भागातून चार महिन्यांपासून सुमारे ७ मोटारसायकली चोरीस गेल्याबाबत गुन्हे दाखल होते. या चोऱ्यांना आवर घालण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी संबंधित हद्दीतील पोलीस व खबऱ्यांमार्फत मोटारसायकल चोरीच्या जाणाऱ्या घटनांची माहिती घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष
पथक तयार करून तपास करण्यास सुरुवात केली.
या तपासात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची मोटारसायकल चोरून नेण्याची पद्धत, तसेच घरफोडी करण्याची पद्धत यावरून सहा. पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस नाईक दीपक साबळे, सुयोग लांडे यांनी १४ नंबर, येडगाव, भोरवाडी, निमगाव सावा, पारगाव, पिंपळवंडी या भागात आठ दिवसांपासून माहिती काढली. तसेच, आजूबाजूच्या वाड्यावस्त्यावंर, गावात बाहेरगावाहून कोण-कोण कामगार, परप्रांतीय शेतीच्या किंवा अन्य कामांसाठी आले आहेत, याची माहिती घेतली. त्यामध्ये त्यांनी रात्रीच्या वेळी हद्दीतील कॅनॉल रस्त्याने फिरणाऱ्या इसमांची चौकशीसुद्धा केली. यादरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटे हे संगमनेर तालुक्यातील घारगाव व संगमनेर परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संगमनेर व घारगाव परिसरात शोधमोहीम सुरू केली. पोलिसांना घारगाव येथील अमित भुतांबरे व रवी कडाळे यांच्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले.
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी कबुली दिली. या कामात त्यांचे इतर साथीदार सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता, त्यांपैकी दोन जण हे अल्पवयीन असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यांनी चोरी केलेल्या दुचाकींमध्ये या दोन जणांकडून १० मोटारसायकली, २० हजार रोख व ९ मोबाईल, असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच, आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना ३ दिवसांची कोठडी मिळाली.

Web Title: Burglars, two-wheeled thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.