घरफोड्या करणारा गजाआड
By admin | Published: March 24, 2017 04:24 AM2017-03-24T04:24:40+5:302017-03-24T04:24:40+5:30
शहराच्या विविध भागांमध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे.
पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे. या चोरट्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी साडेचार हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, चोरटा चोरीपूर्वी ‘रेकी’ करीत असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
रफिक हुसेन शेख (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन रोहिदास साळवे (रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे यांच्या घरामध्ये १८ मार्च रोजी कुलूप उचकटून चोरी झाली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते. त्या वेळी युनिट पाचच्या पथकाला आरोपीबाबत माहिती मिळाली होती. गोंधळेनगर परिसरात सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता लोखंडी कटावणी, सायकल स्टँड, दोन स्क्रू ड्रायव्हर मिळून आले.
ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)