एकाच रात्री तब्बल अठरा ठिकाणी घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:55+5:302021-09-03T04:11:55+5:30
--- घोडेगाव : घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ गावांत एकाच रात्री तब्बल १८ ठिकाणी घरफोड्या करत ...
---
घोडेगाव : घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ गावांत एकाच रात्री तब्बल १८ ठिकाणी घरफोड्या करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ही घटना सोमवारी (३० आॅगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये चोरट्यांनी चार लाखांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री दीड ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पहाटे १.३० पासून तर ४ वाजेपर्यंत गोहे बुद्रुक, डिंभे, कानसे, शिनोली, पिंपळगाव तर्फे घोडा, धोंडमाळ - शिंदेवाडी या सहा गावांतील १८ ठिकाणी जी घरे बंद आहेत अशाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली.
यामध्ये गोहे बुद्रुक येथील गोविंद ठकुजी भवारी, डिंभे येथील सुलोचना दत्तात्रय आमुंडकर, विलास मनाजी डोंगरे, कानसे येथील बाबुराव शंकर आमुंडकर, संजीवनी मोहन येवले, शिनोली येथील विलास नारायण बो-हाडे, ज्ञानेश्वर सदाशिव बो-हाडे, रामदास बबन बो-हाडे, पिंपळगाव घोडे येथील युसुफ हाफिज पटेल, प्रभाकर दशरथ जोशी, मारुती देवजी लाडके, कैलास दत्तात्रय लाडके, शिवाजी सखाराम नाईक, संगीता नारायण ढमढेरे, नारायण एकनाथ जोशी, संगीता रामदास ढमढेरे, दिलीप अनंतराव ढमढेरे, धोंडमाळ- शिंदेवाडी येथील राणुजी सीताराम वायकर, राजाराम सतुजी पवार, पारूबाई लक्ष्मण पवार यांच्या घरांचा समावेश आहे.
ज्या घरात चोरी करायची आहे त्या घराच्या आसपासच्या घरांना चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती. काही गावांतील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये सहा चोर असल्याचे दिसले आहेत. चोरीच्या घटना समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक फौजदार नवनाथ वायाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय जढर, जालिंदर राहणे, अतिश काळे यांनी गावांमध्ये श्वान पथक व ठसेतज्ज्ञ नेले व चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
--
कोट
सीसीटीव्हींची पाहणी केली असता हे दरोडे एकाच टीमकडून झाल्याचे दिसते. प्रभावी यंत्रणांचा वापर करून आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू. पहाटे दोन वाजता काही ग्रामस्थांनी काही दुचाकी चोरांना पाहिले होते. परंतु त्यांनी पोलीस ठाण्याला न कळविल्यामुळे पुढील घटना घडल्या असल्याचे सांगितले. एकानेही ही घटना पोलिसांना कळविली असती तर इतक्या मोठ्या चोऱ्या होण्यापासून रोखता आले असते.
जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक