Pune Crime | पुणे शहरात चार ठिकाणी घरफोड्या; चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज लांबविला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 05:20 PM2022-07-02T17:20:16+5:302022-07-02T15:45:01+5:30
पुणे : शहरात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागात सदनिकांचे कुलूप तोडून सहा लाखांचा ऐवज लांबविला. गोखलेनगर, एरंडवणे तसेच कात्रज भागात या ...
पुणे : शहरात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागात सदनिकांचे कुलूप तोडून सहा लाखांचा ऐवज लांबविला. गोखलेनगर, एरंडवणे तसेच कात्रज भागात या घटना घडल्या.
गोखलेनगर भागात एका ज्येष्ठ महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ६८ हजारांचे दागिने लांबविले. याबाबत ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने घरातील कपाटात दागिने ठेवले होते. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे घरात शिरले. घरातील कपाटातून दागिने लांबविले. दागिने चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरटे माहीतगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव तपास करत आहेत.
कात्रज परिसरातील आगम मंदिराजवळ सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ९० हजारांचे दागिने लांबविले. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत. एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर एका बंगल्यातून चोरट्यांनी खिडकी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील ३३ हजारांची सोन्याची अंगठी लांबविली. याबाबत प्रवीण यादव (५१, रा. ऐश्वर्या बंगला, डीपी रस्ता, एरंडवणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक साळवे तपास करत आहेत.