पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडीसह लुटमारीच्या घटनांचे सत्र सुरूच; चोरट्यांनी लंपास केला सव्वातीन लाखांचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 07:19 PM2021-12-16T19:19:28+5:302021-12-16T19:25:07+5:30
मारहाण करून मोबाईल, रोकड लुटण्याच्या घटना घडत आहेत...
पिंपरी: सुसाट असलेल्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मारहाण करून मोबाईल, रोकड लुटण्याच्या घटना घडत आहेत. तसेच सोनसाखळी चोरीच्याही घटना घडत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चोरीच्या विविध गुन्ह्यांची बुधवारी (दि. १५) नोंद करण्यात आली. यात चोरट्यांनी सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज चोरून नेला.
सीमा हंबीरराव आडनाईक (वय ४०, रा. सहकारनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे कुटुंबियांसह ७ डिसेंबरला बावधन येथे गेल्या होत्या. त्यावेळी मंगलकार्यालात रात्री पावणे नऊ ते साडेनऊच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादीची पर्स चोरून नेली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, असा एकूण दोन लाख २२ हजारांचा ऐवज होता.
योगेश मधुकर काटकर (वय २९, रा. निगडी, मूळ रा. सातारा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे सुरक्षा रक्षक आहेत. गणेश व्हिजन आकुर्डी येथे एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी सकाळी अज्ञात चोरटा एटीएम सेंटरमध्ये आला. त्याने एटीएम मशीनच्या बॅकअपकरिता लागणाऱ्या २४ हजारांच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या.
सोनसाखळी चोरी प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी (दि. १५) सकाळी फिर्यादी त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून जात होत्या. फिर्यादी दुचाकी चालवत होत्या. मोशी-चिखली रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी आणि १५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.
दुकानाचे शटर उचकटून चोरी
किरण नवनाथ काळंगे (वय ४०, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे त्यांच्या राहत्या घराच्या पुढील बाजूस कपड्याचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. १५) पहाटे फिर्यादीच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून ४७ हजारांची रोकड चोरून नेली. तसेच फिर्यादीच्या दुकानाशेजारील ज्वेलर्स दुकान, मेडिकल तसेच इलेक्ट्रिक दुकान, अशा तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.