पुण्याच्या खेडमध्ये 'साडेचार लाखांची' घरफोडी; सोन्या - चांदीच्या दागिन्यांसहित पैसेही लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:59 PM2021-11-10T15:59:55+5:302021-11-10T16:26:42+5:30
चोरटयांनी लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ८५ हजाराची रोख रक्कम व ३ लाख ८२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे व चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ६७ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला
राजगुरुनगर : पुण्यातील राजगुरूनगर भागात फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फ्लॅटमधील सुमारे ४ लाख ६७ हजार ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध स्वप्नील शिवाजी चौधरी (रा. बालाजी अपार्टमेंट,खंडोबाचे माळ राजगुरूनगर) यांनी खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबाच्या माळजवळ बालाजी अपार्टमेंट येथे स्वप्रील चौधरी कुटुंबासोबत राहतात. आठ नोव्हेंबरला त्यांची पत्नी नातेवाईकाकडे गेली होती. तसेच चौधरी हे घरी कोणी नसल्याने ते भावाकडे मोशी ता हवेली येथे मुक्कामी राहिले होते. नऊ तारखेला सांयकाळी चौधरी घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी फ्लॅटमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन दरवाजाचा कोंयडा तोडुन आत प्रवेश केला.
बेडरुममधील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ८५ हजाराची रोख रक्कम व ३ लाख ८२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे व चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ६७ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. तसेच शेजारचा फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा चोरट्यांनी तोडला. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले करत आहे.