घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; एक लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 09:34 PM2021-09-20T21:34:32+5:302021-09-20T21:36:51+5:30
गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्यानं पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडला
धायरी : दोन घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली असून प्रथमेश उर्फ बाब्या अनिल हजारे (वय १९ वर्षे रा. नांदेडफटा,) असे त्या चोरट्याचं नाव आहे.
याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धायरी येथील डीएसके विश्व रस्त्यावर सराईत आरोपी प्रथमेश उर्फ बाब्या अनिल हजारे हा गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्यानं पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडला. त्याच्याकडे विचारपूस केली असता काही न सांगता उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक सखोल चौकशी करता त्याने धायरी येथील बेनकर वस्ती न-हे येथील नवकर वस्ती या परिसरातील दोन दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याचे कबुल केले.
तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यात असणाऱ्या दोन दुचाकी मिळुन आल्या. ह्या दोनही दुचाकी न-हे व मार्केट यार्ड येथून चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार आबा मोकाशी, शंकर कुभांर, विकास बांदल, सचिन माळवे, किशोर शिंदे, देवा चव्हाण, अविनाश कोंडे, सागर भोसले, सुहास मोरे, शैलेश नेहरकर, इंद्रजित जगताप, विकास पांडोळे यांच्या पथकाने केली आहे.