पुणे शहरात गतवर्षीपेक्षा यंदा ३३ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; हडपसर, कोंढवा परिसरात अधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:44 PM2021-08-11T20:44:29+5:302021-08-11T20:57:01+5:30

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर शहरातील घरफोड्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ...

Burglary has increased by 33% this year as compared to last year In Pune ; The highest percentage is in Hadapsar, Kondhwa area | पुणे शहरात गतवर्षीपेक्षा यंदा ३३ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; हडपसर, कोंढवा परिसरात अधिक प्रमाण

पुणे शहरात गतवर्षीपेक्षा यंदा ३३ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; हडपसर, कोंढवा परिसरात अधिक प्रमाण

googlenewsNext

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर शहरातील घरफोड्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जुलैअखेर पुणे शहरात गतवर्षीपेक्षा ३३ टक्के घरफोड्या वाढल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शहरातील पूर्व भाग प्रामुख्याने हडपसर, कोंढवा, वानवडी लोणी काळभोर परिसर तसेच नगर रोड, येरवडा, विमाननगर परिसरात अधिक असल्याचे दिसून येत आहे.

शहरात गेल्या वर्षी जुलै २०२० अखेर १५९ घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात यंदा ३४ ने वाढ झाली असून जुलै २०२१ अखेर तब्बल २१३ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने परिमंडळ पाच आणि परिमंडळ ४ या शहराच्या पूर्व भागातील वेगाने वाढत असलेल्या परिसरात घरफोडीचे गुन्हे वाढत असल्याचे दिसून आले आहे. 

शहराच्या मध्यवस्तीत होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या दुप्पट या नगर रोड व खडकी, औंध बाणेर या उपनगरांच्या परिसरातील परिमंडळ ४ च्या हद्दीत घडत आहेत. परिमंडळ १ च्या तिप्पट घरफोडीचे गुन्हे हडपसर, वानवडी, लोणीकंद, मुंढवा या परिमंडळ ५ च्या हद्दीत घडताना दिसत आहेत.

सोन्याचे दागिने, रोकडसह चोरट्यांचा कपड्यांवरही डल्ला
पुणे शहरातील घरफोड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढ होत असून, मंगळवारी एकाच दिवसात चार ठिकाणी घरफाेड्यांचे गुन्हे दाखल करण्यात करण्यात आले आहेत. या ४ घरफोड्यांमध्ये साडेपाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर घरफोड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर, अलंकार, लोणी कंद व कोंढवा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केसनंद गावातील वाघोली केसनंद रोडवरील ओम स्मार्ट नावाच्या कपडे आणि खेळणी विक्री करणाऱ्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना ९ व १० ऑगस्टच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी दुकानातील रोकड व कपडे असा १ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अतुल रामदास हराळ (वय ३५) यांनी लोणी कंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

चार घरफोड्यांत साडेपाच लाखांचा ऐवज लंपास : जरीच्या साड्या पळविल्या

शिवाजीनगर येथील एका बंद बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, ८ हजारांची रोकड व जरीच्या ३५ साड्या असा १ लाख ८३ हजारांचा ऐेवज चोरुन नेला. याप्रकरणी प्रवीण राम नाईक (वय ५६, रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

बंद फ्लॅटच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी राजवंती कुरुंदवाड (वय ६०, रा. आनंदनगर, हांडेवाडी रोड) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी घरात शिरुन २५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला.

डहाणूकर काॅलनीतील एका बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. फ्लॅटचे मालक हे अमेरिकेला गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
 

Web Title: Burglary has increased by 33% this year as compared to last year In Pune ; The highest percentage is in Hadapsar, Kondhwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.