पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By नितीश गोवंडे | Published: December 18, 2023 02:44 PM2023-12-18T14:44:50+5:302023-12-18T14:45:15+5:30

सोलापूर आणि अहमदनगर पोलिसांकडून प्रयत्न सुरू असताना पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडला

Burglary in Pune Solapur Ahmednagar district Pune police handcuffed inn robber | पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे: शहरासह सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी, तसेच दरोडा घालून गुन्हे करणाऱ्या सराईत दरोडेखोराला पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपी टाक आणि त्याच्या साथीदारांनी सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात २ ठिकाणी दरोडा घातला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी टाकच्या साथीदारांना अटक केली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार देखील केला होता. गोळीबारानंतर आरोपी हंसराज टाक पसार झाला होता. पोलिसांच्या तपास पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सोलापूर आणि अहमदनगर पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने हंसराज टाक याला हडपसर भागातून सापळा रचून पकडले आहे. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.

आरोपी हंसराज रणजीतसिंग टाक (१८, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. गुन्हे शाखेतील युनिट ६ चे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी टाक हा कॅनोल रस्ता परिसरात संशयितरित्या थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपी टाक याला ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत त्याने शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात वेळोवेळी घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. चौकशीत त्याने नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, सहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहीगुडे आणि कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली.

Web Title: Burglary in Pune Solapur Ahmednagar district Pune police handcuffed inn robber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.