सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी; ३३ लाखांचा ऐवज लंपास
By नितीश गोवंडे | Published: November 27, 2023 04:53 PM2023-11-27T16:53:31+5:302023-11-27T16:53:48+5:30
गुन्ह्यामध्ये चोरांनी सोन्या चांदीसह डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा ३३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला
पुणे: शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी शहरात दोन वेगळवेगळ्या पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यामध्ये चोरांनी सोन्या चांदीसह डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा ३३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यातील पहिल्या घटनेत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील भोसले नगर येथे चोरांनी जबरी चोरी केली. अज्ञात चोरांनी एका बंगल्यातून तब्बल ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी दीपक विलास जगताप (५२, रेंज हिल रोड, भोसले नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (२५ नोव्हेंबर) रात्री साडे दहा ते रविवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी बाराच्या दरम्यान घडला आहे. चोरांनी जगताप यांच्या घराच्या किचनच्या खिडकीचे स्लायडिंग उघडून घरात प्रवेश केला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या दोन लॉकरमधील १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, डायमंड व चांदीचे दागिने असा ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.
दुसरी घटना विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव पेठ येथे घडली आहे. चिमण्या गणपती चौकातील एका घरातून चोरट्यांनी ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मनोज भागवत सुतार (३२) यांनी तक्रार दिली आहे. मनोज भागवत हे पत्नीसह रविवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने खिडकीच्या वरील पत्रा तोडून घरात प्रवेश केला. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ५ ग्रॅम सोने, रोख रक्कम आणि मोबाईल असा ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मनोज सुतार साडेतीनच्या सुमारास घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक शेडजाळे करत आहेत.