स्वत:च्याच घरात केली घरफोडी
By admin | Published: February 23, 2016 03:22 AM2016-02-23T03:22:20+5:302016-02-23T03:22:20+5:30
प्रियकरासोबत दक्षिण भारताच्या सहलीला जायचे असल्यामुळे मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच घरात तब्बल ११ लाख ७५ हजारांची घरफोडी केल्यानंतर त्या ऐवजामधून प्रियकराला
पुणे : प्रियकरासोबत दक्षिण भारताच्या सहलीला जायचे असल्यामुळे मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच घरात तब्बल ११ लाख ७५ हजारांची घरफोडी केल्यानंतर त्या ऐवजामधून प्रियकराला मोटारसायकल विकत घेणाऱ्या तरुणीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोटच्या मुलीनेच हे कृत्य केल्याचे समजल्यानंतर आईवडिलांना मात्र धक्का बसला आहे.
श्रुतिका राजेश येनपुरे (वय २१, रा. शिवप्रसाद सोसायटी, सिंहगड रस्ता), प्रियकर अजय अनिल कांबळे (वय २१, रा. भूगाव, ता. मुळशी), अमोल हौसिराम जाधव (वय २०, रा. दौंड) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा आणि सोनार परेश ऊर्फ पप्पू धोंडीराम खर्डेकर (वय ३०, रा. ५१०, रविवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतिका आणि तिचा प्रियकर अजय कोथरूड भागातील एका महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला एकाच वर्गात शिकतात. तर, अमोल आणि अल्पवयीन मुलगाही त्यांचे महाविद्यालयीन मित्र आहेत. श्रुतिका हिला अजयसोबत दक्षिण भारतामध्ये फिरायला जायचे होते. तसेच तिने त्याला नवीन मोटारसायकल विकत घेऊन देण्याचे वचन दिले होते.
फिर्यादी राजेश ज्ञानेश्वर येनपुरे (रा. शिवप्रसाद सोसायटी, सिंहगड रस्ता) कुटुंबीयांसह ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान कोकणामध्ये सहलीसाठी गेले होते. या सहलीला जाताना श्रुतिकाने तिच्याकडे असलेल्या घराची दुसरी चावी अजयकडे देत घरातील ऐवजाची माहिती देऊन घरफोडी करायला सांगितले.
त्यानुसार सर्व जण सहलीला गेल्यावर आरोपींनी घरफोडी करून रोकड, मोबाईल आणि सोन्याचांदीचे दागिने, असा एकूण ११ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास केला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच युनिटच्या कर्मचाऱ्यांना रविवार पेठेतील चांदीचा मूर्तिकार पप्पू खर्डेकर याने सोन्याचे दागिने विकत घेऊन त्याची लगड बनविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खर्डेकर याच्याकडे चौकशी केली असता त्याने आरोपींनी त्याच्याकडून राणीहार व रुद्राक्ष माळ केल्याचे सांगितले.
ही माहिती समजताच अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश निकम आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कुटुंबीयांसोबत कोकणात गेल्यानंतरही श्रुतिका तिच्या मित्रांच्या संपर्कात होती. चोरीबाबत वारंवार माहिती घेत होती. चोरीच्या पैशामधून तिने अजयसाठी ९८ हजारांची एक महागडी मोटारसायकल विकत घेतली. पोलिसांनी चोरीला गेलेल्या ऐवजापैकी २० तोळे सोने, १ लाख ४३ हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली आणि विकत घेण्यात आलेली अशा दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या घरफोडीबाबत गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत खबऱ्यांचे जाळे तयार करण्यात आले. ही चोरी बनावट चावीचा वापर करून झालेली असल्यामुळे येनपुरेंच्या घरामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवरही ‘शॅडोवॉच’ ठेवण्यात आला.
आपली मुले आणि मुली कोणाच्या संपर्कात आणि संगतीमध्ये आहेत, याची पालकांनी माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे. क्षणिक आकर्षण नातेसंबंधांवर परिणाम करीत असून, यामधून चुकीच्या घटना घडत आहेत. पालकांनी याबाबतीत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
- पी. आर. पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा