Baramati: बारामती शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 06:28 PM2023-08-31T18:28:31+5:302023-08-31T18:30:02+5:30
या प्रकरणी अद्याप फिर्यादही दाखल झाली नसल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले...
बारामती :बारामती शहरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बुधवारी (दि. ३०) पहाटे उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या सायली हील परिसरातील चिंतामणी अपार्टमेंटमधील दोन बंद असलेल्या सदनिका चोरट्यांनी फोडल्या. दोन्ही सदनिकांतील कुटुंब गावाला गेलेले असल्याने चोरीला गेलेल्या ऐवजाची माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी अद्याप फिर्यादही दाखल झाली नसल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले.
बारामती शहरात क्रीडा संकुल परिसरात पोलिसांच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल १६ ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या. तालुका व शहर पोलिसांनी काही आरोपी अटक केलेले असले तरी मुख्य १६ घरफोडीतील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
बुधवारी पहाटे पुन्हा दोन सदनिका फोडल्याने बारामतीकर चिंतित आहेत. सदनिका बंद करून गावाला जाण्यासाठी आता बारामतीकर धास्तावले आहेत. बंद सदनिका हेरून चोरटे त्यांना लक्ष्य बनवित असल्याने बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या घरफोडीच्या घटनांबाबत पोलिसांना समज दिली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोइटे यांनादेखील पवार यांनी वाढत्या चोऱ्या थांबविण्यासाठी सूचना केल्या आहेत. मात्र, त्यानंतरदेखील सत्र सुरूच आहे.