Pune | चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचे दहन; दौंडमध्ये शहर बंदला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 03:58 PM2022-12-12T15:58:13+5:302022-12-12T15:58:39+5:30
वंचित बहुजन आघाडीने दौंड बंदचे आवाहन केले होते...
दौंड (पुणे) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ दौंड शहर बंद ठेवण्यात आले. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपुरुषांविषयी अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणाऱ्या भीम सैनिकाला अटक करून पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने दौंड बंदचे आवाहन केले होते.
व्यापारी वर्गाने बंदला प्रतिसाद दिला. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध दुचाकी रॅली काढली. दौंड पोलिस स्टेशनसमोर रॅलीची सांगता झाली. या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, नागसेन धेंडे, पांडुरंग गडेकर यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. ज्या भीम सैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला, तो मागे घ्यावा, तसेच चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भाजपतील नेत्यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचे सत्रच सुरू केले आहे. ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. अशा घटना पुन्हा झाल्या तर समस्त बहुजन समाज, दलित समाज तुमचे सरकार घरी पाठविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.