विद्युत तारांमधील घर्षणामुळे चार एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:39 AM2019-03-10T02:39:52+5:302019-03-10T02:40:08+5:30
आगमळा येथील दुर्घटना; लाखो रुपयांचे नुकसान
आळेफाटा : आळे (ता. जुन्नर) परिसरातील आगमळा येथे विद्युत तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या उडून लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे चार एकर ऊस जळाला. शुक्रवारी दुपारी तीननंतर ही घटना घडली. याबाबत समजलेल्या माहितीनुसार : आगरमळा येथे खंडू नाना गुंजाळ व बाळासाहेब देवराम गुंजाळ यांनी चार एकर क्षेत्रात ऊस पीक घेतले आहे. हा ऊस तोडणीच्या अवस्थेत आला होता. त्यांच्या या उसाच्या शेतावरून विद्युत पुरवठा तारा गेलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यानंतर या तारांमध्ये घर्षण होऊन त्यातील ठिणग्या खाली पडल्या. यामुळे शेतातील उसाला आग लागली.
दरम्यान, उष्णता व हवा यामुळे पाहता पाहता ही आग पसरत गेली. तेथील शेतकरीवर्गाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र संपूर्ण चार एकरावरील ऊस जळून गेला. संबंधित शेतकऱ्यांनी विघ्नहर कारखान्याचे पिंपळवंडी कार्यलयात माहिती दिली. संबंधितांनी घटनेचा पंचनामा केला.