जळीत कांडाचे लोण आता मध्यवस्तीत
By admin | Published: April 23, 2016 01:08 AM2016-04-23T01:08:30+5:302016-04-23T01:08:30+5:30
वाहनांची जाळपोळ करुन आनंद लुटण्याची नवी मानसिक विकृती जन्माला येत असून उपनगरांमधील जाळपोळीचे हे लोण आता शहराच्या मध्यवस्तीत आले आहे.
पुणे : वाहनांची जाळपोळ करुन आनंद लुटण्याची नवी मानसिक विकृती जन्माला येत असून उपनगरांमधील जाळपोळीचे हे लोण आता शहराच्या मध्यवस्तीत आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघाजणांनी शुक्रवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास वाहने पेटवून दिल्याची घटना शुक्रवार पेठेमध्ये घडली. या घटनेत एकूण सहा वाहने जळून खाक झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
आरिफ बागवान (वय 49, रा. 743, नेहरु चौकाजवळ, शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान यांची दुचाकी त्यांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरासमोर लॉक करुन लावलेली होती. त्यांनी दुचाकीवर कव्हरही घालून ठेवलेले होते. रात्री जेवण करुन सर्वजण झोपी गेले. शुक्रवारी पहाटे साधारणपणे साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरुन दोघेजण आले. त्यांनी गाडीचे कव्हर पेटवून दिले. हे कव्हर पेटल्यामुळे दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीने पेट घेतला.
काही क्षणातच ही दुचाकी जळून खाक झाली. शेजारी उभ्या असलेल्या आणखी तीन दुचाकींनाही आग लागली. त्यानंतर पुढे गेलेल्या आरोपींनी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दुचाकी जाळली. त्यानंतर हे दोघेही पळून गेले.
वाहनांना आगी लावण्याआधी आरोपींनी अनेक ठिकाणी वाहने जाळण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनांवर कव्हर घातलेले आहे; तीच वाहने पेटवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. शुक्रवार पेठेमध्येही आधी गाडीचे कव्हर आरोपींनी पेटवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
पोलिसांनी शुक्रवार पेठ आणि आसपासच्या भागातील सहा ठिकाणांवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
त्यावरुन आरोपींचा तपास सुरु करण्यात आला आहे. खब-यांकडून माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले असून फुटेजमध्ये दिसणा-या आरोपींच्या हावभावाप्रमाणे असलेल्या तरुणांकडे चौकशी सुरु करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
> अॅडव्हेंचर म्हणून जाळपोळीचा प्रकार
1नागरिकांनीही शक्यतो रस्त्यावर वाहने लावणे टाळले पाहिजे. सोसायट्यांचे पार्किंग ‘फुल्ल’ झाल्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर वाहने लावावी लागतात. मात्र, अशा प्रकारे बेवारस अवस्थेत रस्त्यावर वाहने उभी करणे धोकादायक आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना क्षणिक रागामधून घडलेल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, काही तरुण ‘अॅडव्हेंचर’ म्हणून अशी कृत्य करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. कोथरुड, कात्रज भागात वाहनांना लावण्यात आलेल्या आगींच्या घटनांचा या घटनेशी संबंध आहे का याचीही चाचपणी पोलीस करीत आहेत.2वाहने जाळण्याची एक मानसिक विकृती जन्माला येत आहे. सर्वसामान्यांचे नुकसान करुन दहशत निर्माण करण्याची पद्धत पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. गेल्या काही दिवसात संघटीत गुन्हेगारी, टोळी युद्ध यापेक्षाही जाळपोळीच्या घटनांनी अधिक दहशत निर्माण केल्याचे दिसते आहे. या घटनांना पायाबंद घालणे आवश्यक असून पोलिसांच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
> वाघोलीतील आगीत ६ ट्रक खाकवाघोली : पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये ६ ट्रक जळून खाक झाल्याची घटना उबाळेनगर येथील बाबुभाई गॅरेजमध्ये घडली. या आगीमध्ये ट्रकची बॉडी बांधण्यासाठी लागणारे साहित्य देखील जळून खाक झाले असून अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने शेजारी उभ्या असलेल्या ९ ट्रक जळण्यापासून वाचविण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही़
या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नगर महमार्गालगत वाघोली येथील उबाळेनगर परिसरामधे बाबुभाई मिस्त्री यांचे ट्रकची बॉडी बांधणे आणि रिपेयरिंगचे गॅरेज आहे.
शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास गॅरेजमध्ये झोपलेल्या प्रशांत
जायभाये याला भिंतीच्या कडेने असणाऱ्या पत्र्याच्या शेडला मोठी आग लागली असल्याचे दिसले. त्याने तत्काळ शेजारी आणि मालकाला आगीबाबत कळविले. आगीचे लोट मोठे असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलविले. अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यागोदार पत्र्याच्या शेडसमोर असणारे ६ ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी बॉडीचे काम करण्याकरिता आलेले ६ ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले होते.
यातील एक ट्रक बॉडी बांधून तयार झाला होता तर पाच ट्रकचे
काम सुरु होते. ट्रक बरोबरच पत्र्याच्या शेडमध्ये असलेले साहित्य व
मशीनरी देखील आगीच्या झपाट्यात खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने याच ठिकाणी उभे असलेले ९ ट्रक सुरक्षित राहिले.