वणव्यात फळबागा जळाल्या
By admin | Published: April 25, 2016 02:32 AM2016-04-25T02:32:42+5:302016-04-25T02:32:42+5:30
नायगाव (ता. भोर) च्या हद्दीत आंबा, जांभूळ, पेरूच्या बागा डोंगराला अचानक वणवा लागल्याने जळून खाक झाल्या.
कापूरव्होळ : नायगाव (ता. भोर) च्या हद्दीत आंबा, जांभूळ, पेरूच्या बागा डोंगराला अचानक वणवा लागल्याने जळून खाक झाल्या. हातातोंडाशी आलेला घास आगीच्या भक्ष्यस्थानी पडून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. जिवापाड जपलेली झाडे, डोंगराला अचानक आगीने वेढल्याने बघता बघता जळू लागली.
शेताच्या बांधावर काम करणारा शेतकरीही आग विझविण्यासाठी सैरावैरा धावला. पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने भरउन्हात पेट घेतल्यामुळे आगीचा एकच डोंब उसळला आणि लाखोंची वनसंपदा नष्ट झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : नायगाव येथे गावाच्या पश्चिमेकडील डोंगरपायथ्याला लागलेल्या आगीत येथील शेतकरी देवेंद्र सावंत, चंद्रशेखर सावंत, प्रकाश सावंत, शिवाजी सावंत व शिवकुमार राठी यांच्या मालकीच्या आंबा, पेरू, जांभूळबागा होत्या. यात फळझाडांचे नुकसान झाले. त्यासाठी ठिबक सिंचनचे साहित्य, तसेच दोन ट्रक जळाऊ लाकूड व मोठी सागाची झाडे यांचे नुकसान झाले, तर प्रकाश सावंत व शिवकुमार राठी यांच्या आंब्याची बाग, पेरू आणि जांभळाची तयार झाडे व पी. व्ही. सी. पाइपलाइन, यावेळी आकाशात धुराचे लोट उसळत होते.
(वार्ताहर)