पुणे-नाशिक महामार्गावर बसचे ब्रेक फेल, सुदैवाने मोठी दुर्घटना, जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:12 AM2017-11-24T01:12:06+5:302017-11-24T01:12:34+5:30
मंचर : ब्रेक फेल झाल्याने एसटी बस पुणे-नाशिक महामार्गावरून थेट शंभर फूट अंतरावर जाऊन सीमा पेंट्स या रंगांच्या दुकानात शिरली.
मंचर : ब्रेक फेल झाल्याने एसटी बस पुणे-नाशिक महामार्गावरून थेट शंभर फूट अंतरावर जाऊन सीमा पेंट्स या रंगांच्या दुकानात शिरली. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी मंचर एसटी बस स्थानकासमोर घडली. सुदैवाने रस्त्यात वाहने अथवा नागरिक नसल्याने जीवित हानी झाली नाही. यानिमित्ताने पुणे येथे संतोष माने याने घडविलेल्या घटनेची आठवण नागरिकांना झाली.
मंचर-मांदळेवाडी ही एसटी बस (एचएम १२-ईएफ ६३७३) स्थानकातून बाहेर पडत असताना तिचा ब्रेक फेल झाला. एसटीत ५० प्रवासी होते. ते घाबरले. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी बस महामार्गावर सरळ न नेता पूर्वेला वळविली. वेगात असलेली ही बस १०० फूट पुढे जाऊन सीमा पेंट्स या रंगांच्या दुकानाच्या शटरला धडकली. एसटीच्या धडकेने शटरचा खांब वाकला. एसटी बसचा धक्का एका दुचाकीला लागला. सुदैवाने रस्त्यात कोणी नागरिक नव्हता. त्यामुळे जीवित हानी टळली. या भागात सतत वाहने उभी असतात. ती आज तेथे नसल्याने दुर्घटना टळली गेली.
रंगांच्या दुकानातील एक कामगार शटरजवळ उभा होता. तो टपरीवर गेला अन् एसटी येऊन धडकली. आपण बालबाल बचावल्याचे त्याने सांगितले. घटनेनंतर बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले, तसेच दत्तप्रसाद गाढवे व इतर
तरुण मदतीसाठी धावले. एसटीच्या ब्रेकला हवा भरून ती मागे घेण्यात आली. पोलीस कर्मचारी आल्यानंतर एसटी बस पोलीस ठाण्यात
नेण्यात आली.
एसटीचालकाने प्रसंगावधान राखल्याची चर्चा नागरिक करीत होते. बस महामार्गाने सरळ गेली असती, तर जीवित हानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बसचालकाचे प्रसंगावधान
रंगांच्या दुकानासमोर एक दुकान आहे. गुरुवार असल्याने ते बंद होते. त्यामुळे गर्दी नव्हती; अन्यथा भयंकर घटना घडली असती.
या घटनेने पुणे येथे संतोष माने या चालकाने केलेली घटना अनेकांना आठवली गेली.
या एसटी चालकाने मात्र प्रसंगवधान दाखविले. बाहेर येताना ब्रेक फेल झाला. मोकळी जागा दिसल्याने एसटी बस तिकडे वळवली.
नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, असे चालक जगन्नाथ भाटे
यांनी सांगितले.