एका क्लिकवर मिळणार बसची माहिती
By admin | Published: May 27, 2017 01:19 AM2017-05-27T01:19:21+5:302017-05-27T01:19:21+5:30
प्रवाशांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गरजा व मागणीनुसार सक्षम बससेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार असून
पुणे : प्रवाशांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गरजा व मागणीनुसार सक्षम बससेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार असून, लवकरच बससेवेशी निगडित सर्व बाबींचा समावेश असलेले ‘अॅप’ प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. बसथांबे, सध्याची बसची स्थिती, वेळापत्रक अशी माहिती एका क्लिकवर या अॅपद्वारे मिळणार असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
मुंढे यांनी शुक्रवारी लोकमत कार्यालयात येऊन मनमोकळा संवाद साधला. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. मुलाखतीदरम्यान मुंढे यांनी ‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी आखलेल्या ध्येय-धोरणांविषयी माहिती दिली. बससेवा प्रवाशांना अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सध्या बसथांबे, बसेसचे वेळापत्रक, बसमार्ग याची माहितीच प्रवाशांना मिळत नाही. बस
वेळेत येईल की नाही, हे सांगु
शकत नाही. त्यामुळे पीएमपीकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. त्यात बदल करण्यासाठी बससेवेविषयी त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे मुंढे यांनी सांगितले.
1 कोठेही उभे राहून ‘अॅप’मध्ये एका क्लिकवर परिसरातील सर्व बसथांबे दिसतील. तिथून जाणाऱ्या बस, त्यांचा मार्ग, तसेच सध्या संबंधित बस कोठे आहे, ही माहिती एका क्लिकवर मिळेल. बससेवेविषयीच्या तक्रारीही या अॅपमधून करता येतील.
2या सुविधेमुळे प्रवाशांमध्ये सेवेविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. तसेच संकेतस्थळही चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे अॅप प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.