शहरातील बसथांब्यांची दुरवस्था
By admin | Published: August 11, 2016 02:49 AM2016-08-11T02:49:36+5:302016-08-11T02:49:36+5:30
पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
नेहरुनगर : पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड़ महानगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून शहरात जागोजागी अत्याधुनिक स्टीलचे बसस्टॉप बसविले असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. परंतु, अद्यापही अनेक मार्गावर बसस्टॉप बसविले नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर बसथांब्यावरून अनेक नागरिक, कामगार, महिला, मुली, विद्यार्थी येथून कासारवाड़ी, दापोडी, खड़की, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आदी ठिकाणी कामासाठी इतर महत्त्वाच्या कामासाठी जाण्यासाठी या ठिकाणी दररोज थांबत असतात. यामुळे या बसथांब्यावर प्रवाशांची दिवसभर मोठी गर्दी असते.
परंतु, या ठिकाणी फक्त बसथांबा फलक आहे. मात्र, बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच पावसात - उन्हात ताटकळत बसची वाट बघत उभे राहावे लागते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे प्रवाशांना पावसातच भिजत उभे राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेषत: महिला व मुलींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. हा बसथांबा वल्लभनगर येथील पुणे-मुंबई या मुख्य मार्ग असून, या मार्गावरून दररोज पीएमपीएलच्या शेकडो बसेस या ठिकाणावरून जात असतानादेखील अद्यापही या मार्गावर बसस्टॉप का बसविण्यात आला नाही, असा प्रश्न नागरिक प्रवाशी विचारत आहेत. तातडीने या ठिकाणी पालिका प्रशासनाने बसस्टॉप उभारून प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
फुकटच्या जाहिरातीने विद्रुपीकरण
पिंपरी-चिंचवड़ शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या वतीने जागोजागी अत्याधुुनिक स्टीलचे बसस्टॉप बसविण्यात आले असून, या बसस्टॉप कुठली बस कुठे जाते, याचा फलक लावला आहे. परंतु, अनेक ठिकाणी असलेल्या बसस्टॉप कुठली बस किती वाजता जाणार आहे, कुठली बस किती वाजता येणार आहे, याचे वेळापत्रक लावले नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्टॉपवर वेळापत्रक लावून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेने जागोजागी लाखो रुपये खर्च करून आधुनिक स्टीलचे आधुनिक बसस्टॉप बसविले आहेत. परंतु या बसस्टॉपचा अनेक जण फुकटची जाहिरातबाजी करण्यासाठी उपयोग करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक बसस्टॉपवर पोस्टर फ्लेक्स पॉमपेस्ट्स माहितीपत्रके लावून अनेक उद्योग व्यावसायिक वाढीसाठी या बसस्टॉपचा आधार घेतला असून, फुकटची जाहिरातबाजी करीत आहेत. यामुळे अत्याधुनिक बसस्टॉपचे विद्रूपीकरण होत असून, स्वच्छ सुंदर शहर अशी ओळख निर्माण झालेल्या शहराला या जाहिरातीमुळे विद्रूपीकरणाचे गालबोट लागत आहे.