Pune: बसचे चाक अंगावरून गेल्याने चालकाचा मृत्यू, महिलेविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 14:24 IST2023-12-23T14:24:39+5:302023-12-23T14:24:48+5:30
याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय सुनील खिलारी (वय २७, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे....

Pune: बसचे चाक अंगावरून गेल्याने चालकाचा मृत्यू, महिलेविरोधात गुन्हा दाखल
चाकण (पुणे) : स्कूल बसच्या चाकाखाली जाऊन रिव्हर्स गिअर काढताना चाक अंगावर गेल्याने चालक सुनील खिलारी यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आळंदी फाटा, चाकण (ता. खेड ) येथे गुरुवारी (दि. २१ ) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसच्या सोबत असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय सुनील खिलारी (वय २७, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एका स्कूलची बस (एमएच १४-सीडब्लू १४०४) सुनील वामन खिलारी हे चालवत असताना पुणे नाशिक महामार्गावरील आळंदी फाटा येथे रस्त्यात रिव्हर्स गिअर पडल्याने बस बंद झाली. बस चालक सुनील खिलारी हे बसच्या पुढील डाव्या चाकाखाली जाऊन रिव्हर्स गिअर काढत असताना बससोबत असलेल्या महिलेला बस चालू करण्यास सांगितले.
सदर महिलेकडे कोणताही वाहन चालविण्याचा परवाना नसताना अविचाराने व हयगयीने बस चालू केली. यावेळी बस रिव्हर्स गेल्याने बसचे पुढील डावे चाक सुनील यांच्या छातीवरून जाऊन गंभीर जखमा होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन बसचे व रस्त्यालगतच्या घराचे नुकसान झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.