बस का सोडत नाही म्हणून चालकास बेदम मारहाण : शिवाजीनगर बसस्थानकावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:16 PM2018-08-02T14:16:39+5:302018-08-02T15:53:59+5:30
जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे.
पुणे : जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे. या घटनेत बस चालकाला काही प्रवाशांनी बेदम मारहाण केली असून जखमी चालकास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजय जगन्नाथ जाधव असे जखमी चालकाचे नाव आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर आगारातून एम एच १४ बीटी ४८६०ही बस फलाटावर आणण्यात आली. ही बस लागल्यावर काही युवकांनी या बसमध्ये जागा पकडली व चालकाला बस नाशिकला जाणार का असे विचारले. त्यावर चालकाने बस नाशिकला जाणारी आहे पण निघण्याचा आदेश मिळाला नसल्याने जाणार की नाही माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यावरून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर चालकाला मारहाणही झाली. दरम्यान वाहक (कंडक्टर) आधीच खाली उतरला होता. त्याने गाडीत चढून ड्रायव्हरला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या काही तरुणांनी बाहेरून पाण्याच्या बाटल्या व दगड आत फेकले. त्यातील काहींनी ड्रायव्हर केबिनमधूनही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. अखेर परिवहन महामंडळाचे इतर सहकारी आल्यावर त्यांनी ड्रायव्हर व कंडक्टर यांनी बसमधून बाहेर काढले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.