दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बस चालकाला अखेर अटक; सीसीटीव्हीद्वारे गुन्ह्याची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 10:29 AM2022-01-03T10:29:22+5:302022-01-03T10:30:02+5:30
अपघातात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या बस चालकाचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला
पिंपरी : दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस आणि दुसऱ्यास जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या बस चालकास पोलिसांनीअटक केली. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बसचा शोध घेत या गुन्ह्याची उकल केली. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली.
प्रकाश शामराव बुरंगे (वय २७, रा. वृंदावन कॉलनी, काळेवाडी), असे अटक केलेल्या आरोपी बस चालकाचे नाव आहे. शुभम बबन गायकवाड (वय २०, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर नंदू ज्ञानेश्वर लोखंडे हा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात २८ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास बारणे कॉर्नर, थेरगाव येथे घडली.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम गायकवाड आणि जखमी नंदू लोखंडे हे दोघे २८ डिसेंबरला दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला एका बसने धडक दिली. यात शुभमचा मृत्यू झाला. तर लोखंडे जखमी झाले. अपघात घडल्यावर बसचालक बससह पळून गेला. कोणालाही बसचा क्रमांक माहिती नव्हता. केवळ बसच्या खिडकीच्या खाली पिवळ्या रंगाचे रेडिअम पट्टी आणि त्याखाली निळ्या रंगाचा पट्टा आहे, एवढीच माहिती उपलब्ध होती. अपघाताच्या वेळेचे पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र अपघाताची वेळ रात्रीची असल्याने काहीच ठोस माहिती मिळत नव्हती. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात एक बस दिसून आली. सदर बस थेरगाव येथील हॉस्पिटल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून बस चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, संतोष पाटील, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.