स्वारगेट स्थानकात बसचे स्मारक; एसटी महामंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:39 AM2019-06-03T04:39:48+5:302019-06-03T04:39:54+5:30
पहिली बस ते शिवशाहीपर्यंत प्रतिकृती ठेवणार
पुणे : लाखो प्रवाशांची लाडकी असलेली एसटी बस पहिल्यांदा ज्या ठिकाणाहून धावली, त्या ठिकाणाला आता स्मारकाचे स्वरूप येणार आहे. एसटी महामंडळाने पुणे विभागाच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या या जागेवर स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी पहिली बस ते शिवशाहीपर्यंतच्या १२ ते १३ बसच्या प्रतिकृती ठेवल्या जाणार आहेत. या परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे.
राज्यात दि. १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली एसटी बस धावली. शंकरशेठ रस्त्यावरील एसटीचे पुणे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाखालून ही बस सोडण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने अनेक बदल होत गेले. आता जवळपास दररोज ६५ लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीचे रुपडे पालटले आहे. वातानुकूलित शयनयान बस प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या आहेत. मागील ७१ वर्षांत झालेला हा बदल प्रतिकृतीमधून मांडण्याचा प्रयत्न एसटीकडून केला जाणार आहे. पहिली बस सोडण्यात आलेल्या झाडालगत स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एसटीच्या विभाग यामिनी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडीच्या झाडालगत छोटे उद्यान तयार केले जात आहे. तेच स्मारकात रूपांतरीत केले जाईल.
पहिल्यांदा धावलेल्या एसटीची बॉडी लाकडी होती. तेव्हापासून एसटीमध्ये अनेक बदल होत गेले. लालपरी, परिवर्तन, मानव विकास, मिनी बस, मिडी बस, एशियाड, शिवनेरी, अश्वमेध आणि आता शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. या प्रत्येक बसची एक प्रतिकृती स्मारकाच्या ठिकाणी ठेवली जाणार आहे. एसटीच्या सर्व विभागांच्या नावाच्या पाट्या तिथे असतील. एसटीचा इतिहास असलेला फलकही तिथे लावण्यात येणार आहे. पुढील तीन-चार महिन्यांत या स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे जोशी यांनी सांगितले.