बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

By नितीश गोवंडे | Published: December 1, 2024 06:24 PM2024-12-01T18:24:55+5:302024-12-01T18:25:31+5:30

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला

Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students | बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध कोंंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष पांडुरंग माळवदकर (४७, रा. पिसोळी ग्रामपंचायतीसमोर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या बसचालकाचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी सिंहगड सिटी स्कूलचे संचालक धनंजय तुकाराम महाडिक, संस्थेतील वाहतूक पर्यवेक्षक दौलत दत्तात्रय ढोक, विजय संपत कुंभार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संतोष माळवदकर यांची पत्नी सुनीता (४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष माळवदकर सिंहगड सिटी स्कूलमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. १८ ऑक्टोबर रोजी ते सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात लावलेली बस पाणी मारुन स्वच्छ करत होते. त्यावेळी बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का माळवदकर यांना बसला. विजेच्या धक्का बसल्याने माळवदकर बेशुद्ध पडले. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती. माळवदकर यांची पत्नी सुनीता यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. सदोष वायरमधून विजेचा धक्का बसून पतीचा मृत्यू झाला. बसची देखभाल न केल्याने दुर्घटना घडली. दुर्घटनेस संस्थेतील संचालक तसेच पर्यवेक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले. सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.