तुटतेले पत्रे, वायरचे तुकडे, कचरा, गंजलेली जाळी असे बस स्थानक, दुरुस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 08:07 PM2021-03-17T20:07:49+5:302021-03-17T20:15:51+5:30
बस स्थानकावर बसणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात
छताचे तुटतेले पत्रे, वायरचे तुकडे, आजूबाजूला कचरा, गंजलेली जाळी हे सर्व पाहून बस स्थानक अत्यंत बिकट अवस्थेत दिसत आहे. फातिमा नगर सिग्नल चौका जवळच्या शिवरकर रस्त्यावर सुरुवातीला उजवीकडे असणाऱ्या बस स्थानकाची अशी अवस्था झाली आहे. खूप दिवसांपासून हे स्थानक अशा दुरावस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
शहरात अनेक बस स्थानकाची अशीच अवस्था आहे. काही ठिकणी एका लोखंडावर छोटी पाटी लावण्यात आली आहे. अनेक बस स्थानकावर कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नागरिकांना उन्हाळ्यात बसने प्रवास करताना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही लज्जास्पद बाब आहे. अजूनही बसने प्रवास करण्यासाठी अर्धा, पाऊण तास स्थानकावर थांबावे लागते. अशा वेळी स्थानके उत्तम असणे गरजेचे आहे.
सोलापूर रस्त्यावरीलही हे बस स्थानक अशाच भीषण अवस्थेत आहे. कचरा, धूळ त्याबरोबरच तुटलेले पत्रे अतिशय धोकादायक पद्धतीने लटकत आहेत. त्यामुळे बस स्थानकावर बसणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
.............................................................................................................................................................
मी खूप नेहमीच बसने प्रवास करत असते. या बस स्थानकासंबंधीत अगोदर तक्रारही केली होती. पण प्रशासनाने अजिबात दखल घेत नाही. बसने प्रवास करणारे सर्व नागरिक स्थानकावर येऊन थांबतात. अनेक ज्येष्ठ नागरिक येऊन बसलेले असतात. त्यांच्यासाठी तुटलेले पत्रे, कचरा, धोकादायक ठरू शकतात. प्रशासनाने दखल घेण्याची आम्ही सर्व नागरिक मागणी करत आहोत.
आशा शिंदे
ज्येष्ठ महिला