चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:24 AM2019-01-10T01:24:34+5:302019-01-10T01:24:57+5:30

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल : तीन विद्यार्थी जखमी

The bus stopped due to the driver's control | चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने बस उलटली

चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने बस उलटली

Next

आंबेगाव : मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची बस उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आंबेगाव बुद्रुक येथील महामार्गाच्या लगत असलेल्या पोद्दार शाळेच्या इमारतीसमोरच चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन बस पलटी झाली. यात तीन मुलांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून, काही पालक मुलांना घरी घेऊन गेले.

या बसमध्ये एकूण पंधरा मुले होती. शाळेच्या शेजारीच अपघात झाल्याने तेथील मुलांना घेण्यासाठी आलेले पालक, शाळेचा स्टाफ, गाडीचालक तत्काळ धावून आल्याने मदत मिळून मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत झाली. मुलांचे दैव बलवत्तर होते; कारण हाच अपघात दोनशे मीटर मागे असलेल्या आंबेगाव बुद्रुक भुयारी पुलाच्या मागील तीव्र उतारावर झाला असता तर खूप मोठी हानी झाली असती. या शाळेच्या दुपारच्या शिफ्टमध्ये धनकवडी, कात्रज, वंडरसिटी तसेच सावंत विहार भागातील एकूण १५ विद्यार्थी घेऊन ही बस शाळेकडे जात होती. शाळेजवळील उतारावर चालकाला बसचे ब्रेक निकामी असल्याचे लक्षात आल्यावर मोठा अपघात टाळण्यासाठी म्हणून उतारावरील एक दगडाला बस नेऊन धडकवली, बसचा वेग कमी असल्यामुळे ही बस अलगद पलटी झाल्याने मुलांना इजा झाली नाही. माहिती मिळाल्याप्रमाणे ही बस आठ वर्षे जुनी असून या गाडीची मागील काच फुटली होती. तसेच गाडीदेखील देखभाल-दुरुस्ती केलेली नसल्याचे समजते. तसेच शाळेत तक्रार करूनदेखील शाळा प्रशासनाने पालकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या अपघाताची माहिती घेण्यासाठी म्हणून आंबेगाव पठार पोलीस चौकीचे उपनिरीक्षक शक्तीसिंग खानविलकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली, तसेच पालकांचे व शाळेचे म्हणणे जाणून घेतले.

बसच्या फोडल्या काचा
या वेळी शाळेजवळ असणाऱ्या ईश्वरी भिवडे; तसेच इतर पालकांनी बसजवळ जाऊन बसच्या काचा फोडून जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. आम्ही सर्व पालक ही बस सहा महिन्यांपासून खराब असल्याची तक्रार करीत आहोत. या बसच्या मागील बाजूची काच तुटलेली होती, तसेच बस खराब असल्याची तक्रार करूनदेखील दुरुस्त करत नव्हते, शालेय फी भरमसाट आकारूनदेखील सोयी-सुविधा देत नसतील, तर शालेय प्रशासन काय करत आहे? हाच अपघात महामार्गावर किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी झाला असता तर मुलांचे काय हाल झाले असते?
- सुशील कोळेकर,
पालक

 

Web Title: The bus stopped due to the driver's control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे