‘ती ’बस आंदोलकांमुळे नव्हे तर शॉर्टसर्किटने पेटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 15:55 IST2018-09-10T15:26:37+5:302018-09-10T15:55:49+5:30
कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली.

‘ती ’बस आंदोलकांमुळे नव्हे तर शॉर्टसर्किटने पेटली
पुणे : बसला अचानक आग लागण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. रस्त्यावर उभ्या असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने अचानक पेट घेतल्याची घटना कोथरूड आगारासमोर घडली. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, ही बस आंदोलकांनी पेटवल्याची अफवा काहीकाळ पसरली होती.‘पीएमपी ’च्या बसेस देखभाल दुरूस्ती अभावी सातत्याने पेट घेत आहेत.
पीएमपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या बसेस जागेअभावी रात्री रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. या सुमारास पीएमपीची बससेवा सुरू होते. त्यामुळे ही काही वेळात मार्गावर येणार होती. पण त्यापुर्वीच बस पेटल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमनच्या जवानांनी काही वेळातच आग विझविली. पण तोपर्यंत अर्धी बस जळून खाक झाली. ही बस खासगी ठेकेदाराची होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसची पाहणी करून आग कशामुळे लागली हे पाहिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. पेटलेल्या बसचा व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासनही सतर्क झाले होते. मात्र, ही बस शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचे काही वेळाने स्पष्ट झाले.