दिघीत बस अडकली; शाळेला सुटी
By admin | Published: July 31, 2014 03:14 AM2014-07-31T03:14:35+5:302014-07-31T03:14:35+5:30
दिघी रस्त्यावर आज सकाळपासून पावसामुळे अनेक वाहनांना मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली.
भोसरी : दिघी रस्त्यावर आज सकाळपासून पावसामुळे अनेक वाहनांना मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली. साचलेल्या पाण्यात खासगी बस अडकल्याने प्रवाशांना शिडीच्या सहायाने नागरिकांनी बाहेर काढले, त्यामुळे मोठे संकट टळले अशी चर्चा होती. तर दुसरीकडे भोसरी आदिनाथनगर येथेही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रात्रभर नागरिकांच्या घरात पाणी साठल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
खासगी कंपनीची बस सकाळी कामगारांना सोडण्यास जात असताना भोसरी-आळंदी रस्त्यावरून दिघीकडे जात असताना गवळी लॉन्ससमोरील जागेत दिघी रस्त्यावर अचानक बस पाण्यात अडकली. त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. ही बस ५ ते ६ फूट खोल अडकल्याने बसमध्ये पाणी शिरले होते. दिघीतील विश्वकांत वाळके, नीलेश वाळके, प्रवीण वाळके, सागर शिंदे, आकाश पवार, शैलेश वाळके युवकांनी लोखंडी शिडीच्या सहायाने प्रवाशांना बाहेर काढले. यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. बुधवारी दिवसभर अनेक वाहने या ठिकाणी अडकली. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आदिनाथनगर येथे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले.दरवर्षी पाणी साठते. आम्ही सारख्या तक्रारी करतो; पण दखलच घेत नाहीत. या वेळी तर रात्रीपासून घरात पाणी शिरले आहे, अशा संतप्त प्रतिकिया नागरिकांनी दिल्या. (वार्ताहर)