रामटेकडी पुलावरील सुशोभीकरणासाठी लावलेली झाडी जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:19+5:302021-03-16T04:11:19+5:30
रामटेकडी पुलावरील रस्त्याच्या बाजूला आणि दुभाजकामध्ये झाडी लावून सुशोभीकरण करण्यासाठी लावलेली झाडी जळून गेली आहेत. त्यामुळे आता गवत काढण्यासाठी ...
रामटेकडी पुलावरील रस्त्याच्या बाजूला आणि दुभाजकामध्ये झाडी लावून सुशोभीकरण करण्यासाठी लावलेली झाडी जळून गेली आहेत. त्यामुळे आता गवत काढण्यासाठी खोदाई सुरू केली आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्ता सुशोभीकरणाचा प्रकार सुरू आहे. मात्र, अद्याप या ठिकाणी झाडी बहरली नाहीत, तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये झाडी लावणे आणि उन्हाळ्यामध्ये वाळल्यानंतर ती मुळासकट काढून जमीन तयार करण्याचे काम सुरू असते. प्रशासनाला सोलापूर रस्त्याचे रुंदीकरण करायचे की, सुशोभीकरण करायचे आहे, हे ठरवावे आणि जनतेला सांगावे, असा सवाल हडपसरवासीयांनी उपस्थित केला आहे.
रामटेकडी पुलावरील रस्तादुभाजक आणि बाजूला दरवर्षी झाडे लावली जातात. मात्र, तेथे एकही झाड वाढलेले वा फुललेले दिसत नाही. मात्र, त्यासाठी दरवर्षी हजारो रुपयांचा निधी खर्ची केला जातो. आता रामटेकडीवरील रस्त्याच्या बाजूला झाडी वाळून गेली आहे, तेथे खोदाई करण्याचे काम सुरू आहे. तसेच इथे पावसाळ्यामध्ये टँकरने पाणी घातले जाते. उन्हाळ्यात त्या झाडांची जागा खोदली जात आहे. यामध्ये नेमके कोणाचे आर्थिक हित गुंतले आहेत, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
पुलगेट-हडपसर रस्तारुंदीकरण आणि सुशोभीकरणाची कामे गेल्या तीस वर्षांपासून सुरू आहेत. ती अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम आणि सुशोभीकरण कधीही संपणार नाही का ? असा सवालही उपस्थित होत आहे.
-------------------
पुणे-सोलापूर रस्तारुंदीकरण आणि सुशोभीकरणाचा नेहमीच घाट घातला जात आहे. मात्र, त्यातील एकही काम आजपर्यंत पूर्णत्वास गेले नाही, याची वारंवार प्रचिती आली आहे. एका बाजूला रस्ता करायचा, दुसऱ्या बाजूने खोदायचा, एखाद्या बाजूला झाडी लावायची आणि दुसऱ्या बाजूला खोदून काढाय,ची असा प्रकार हडपसरवासीयांना नवीन नाही.
- अमोल कापरे
----------