मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेच्या कारणास्तव ८ दिवस व्यवसाय बंद; पालिकेने पथारी शुल्क माफ करावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 04:10 PM2023-08-02T16:10:12+5:302023-08-02T16:11:03+5:30
पुणे महापालिकेकडून या पथारी व्यावसायिकांकडून ५० रुपये ते २०० रुपयांपर्यंत प्रतिदिन शुल्क घेतले जाते
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचापुणे दौरा निश्चित झाल्यावर प्रशासन जोरदार तयारीला लागले होते. मोदी जाणाऱ्या मार्गांची कडक पाहणी करण्यात येत होती. तसेच त्या मार्गाची दुरुस्तीही करण्यात आली होती. शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांसमोर हा दौरा एक आव्हानच होते. परंतु जिल्हाधिकारी, पुणे महानगपालिका, आणि पोलीस प्रशासन यांच्या अथक प्रयत्नातून दौरा सुखरूप पार पडला. दौरा होण्याअगोदर एक आठवडा प्रशासन अत्यंत तत्परतेने कार्यरत होते. त्यांनी मोदी जाणारे मार्ग, त्यांच्या पुरस्कार व उदघाटनाची ठिकाणे ताब्यात घेतली होती. तसेच व्यावसायिकांसाठी काही नियमही लागू केले होते.
अशातच २४ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत मध्यवर्ती भागातील पथारी व्यावसायिकांना सुरक्षेच्या कारणास्तव व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने या सात दिवसांचे पथारी शुल्क माफ करावे अशी मागणी जाणीव संघटनेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
पुणे महापालिकेकडून या पथारी व्यावसायिकांकडून ५० रुपये ते २०० रुपयांपर्यंत प्रतिदिन शुल्क घेतले जाते. आठ दिवस व्यवसाय बंद ठेवल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या भागातील व्यवसाय बंद होते, तेथील शुल्क माफ करावे. यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात यावी अशी मागणी जाणीव संघटनेच्या अध्यक्षा श्वेता ओतारी, कार्यवाह संजय शंके, विभागीय अध्यक्ष विनायक दहिभाते यांनी पत्रकाद्वारे केली आहे.