बनावट ई-पास तयार करून देण्याचा धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:18+5:302021-04-30T04:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊन काळात तातडीने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एका तरुणाने त्याचा धंदाच मांडला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊन काळात तातडीने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एका तरुणाने त्याचा धंदाच मांडला होता. दुसऱ्यांचीच कागदपत्रे आणि कारणे वापून १८ जणांना डिजिटल पास काढून देणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
धनाजी मुरलीधर गंगनमले (वय २९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर ई-पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना एकाच लॅपटॉपवरून अनेक ई-पास येत असल्याचे लक्षात आले. धनाजी गंगनमले हा स्वत:च्या घरात वेबसाईटवरून ई-पास तयार करत असे. त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करून शासनाची व ई-पासधारकांची फसवणूक करून बनावट ई-पास तयार करत होता. त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरून ई-पासची विक्री करीत असत्याचे आढळून आले.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस नाईक इरफान पठाण, निलम शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे यांनी ही कामगिरी केली.
सहानुभूतीचा घेत होता गैरफायदा
डिजिटल पाससाठी कोविड चाचणी प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्यावेळी अचानक कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी गावाला जायचे असेल तर त्यांना असे प्रमाणपत्र मिळणे शक्य नसते. याचा गैरफायदा घेऊन धनाजी गंगनमले हा लोकांना मी ई-पास काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून सर्व माहिती व कागदपत्रे घेत. त्यानंतर त्यांच्या खऱ्या कारणाऐवजी नातेवाईक मयत झाल्याचे कारण देऊन ई-पास घेत असे. अशा प्रकारे त्याने चुकीची कारणे देऊन १८ हून अधिक पास घेतले होते. तसेच त्याने ६ पास बनावट तयार केले होते. एकाच ठिकाणाहून अधिक अर्ज येत असल्याचे सेवा प्रकल्पात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांच्या लक्षात आले. त्यांनी व त्यांच्या पथकाने ज्यांना ज्यांना ई-पास देण्यात आले, त्यांच्याकडे चौकशी केल्यावर धनाजी गंगनमले याची लबाडी उघडकीस आली.