फोफावला ‘मिनरल वॉटर’चा व्यवसाय

By Admin | Published: May 7, 2015 05:12 AM2015-05-07T05:12:35+5:302015-05-07T05:12:35+5:30

एकीकडे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे पुरवत असल्याचा प्रशासन दावा करीत आहे, तरीही नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला मागणी वाढतच आहे.

Business of 'Mineral Water' at Fospa | फोफावला ‘मिनरल वॉटर’चा व्यवसाय

फोफावला ‘मिनरल वॉटर’चा व्यवसाय

googlenewsNext

अंकुश जगताप, पिंपरी
एकीकडे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे पुरवत असल्याचा प्रशासन दावा करीत आहे, तरीही नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला मागणी वाढतच आहे. त्यामुळे मागील ५ वर्षांत पिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी परिसरात बाटलीबंद पाण्याचा धंदा वर्षाकाठी ४०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शहरातील एखाद्या बड्या उद्योगालाही अर्थार्जनात मागे टाकणारे व डोळे विस्फारणारे हे आकडे आहेत. यातून सार्वजनिक पाणी वितरणाचे वाभाडे निघत आहेत. प्रशासनाचे प्रयत्न फोल ठरत असून, बाटलीबंद पाणी विकणारांचे हित साध्य होत असल्याचे उघड होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात इतर शहरांच्या तुलनेत पाणी स्वच्छ मिळत असल्याचा दावा प्रशासन करीत असते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पाणी वितरणातील विस्कळीतपणाचा अनुभव शहरवासीयांना आला आहे. शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या पवना नदीकाठचे ग्रामस्थ दहा वर्षांपूर्वीपर्यंत थेट नदीतील पाणी पिण्यासाठी वापरत. मात्र, कारखान्यांचे रसायणमिश्रित आणि गावे, शहरांचे सांडपाणी सोडले गेल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. नदीचे पाणी पिण्यासाठी सोडा, अंघोळीसाठीही वापरले जात नाही. प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याची नासाडी झाली असतानाच शहरालगतच्या मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये सार्वजनिक पाणी व्यवस्था अद्यापही सक्षम नाही. अनेक गावांचे पाणी योजना प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीविना अथवा निधीअभावी रखडले आहेत. परिणामी, या भागातील रहिवाशांना नाइलाजास्तव बाटलीबंद पाण्याच्या पर्यायांचा विचार करावा लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न रखडवत ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कळत नकळत बाटलीबंद पाणी व्यावसायिकांना पोषक धोरण राबविण्याचा प्रकार सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शहरातील अधिकृत ५, तसेच बाहेरील पाणी शुद्धीकरण कारखान्यांकडून हे पाणी पुरविले जाते. मात्र, त्यापोटी खिशाला मोठी झळ बसत आहे.

पाण्याच्या बाटलीचे दर : १ लिटर (" २०) अर्धा लिटर बाटली (" ६ ते १०) २० लिटर (" ५०) १५ लिटर जार (" ६० )

मंगल कार्यालयांत बाटल्यांचे फॅड
शहरात ८०, तर मावळ, मुळशी भागात ५० मंगल कार्यालये आहेत. काही वर्षांपासून त्यामध्ये पिण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीचे अथवा कार्यालय मालकाकडील बोअरवेलचे पाणी पिण्यास वापरणे बंद होत आहे. त्या ठिकाणी बाटल्यांमधूनच पाणी देण्याचा आग्रह धरला जातो. हजार लोकांसाठी अर्धा लिटरच्या १८०० बाटल्या अथवा २० लिटरच्या ४० बाटल्या लागतात. नवीन पद्धतीने आलेले थंड पाण्याचे ५५ जार पुरवावे लागत असल्याची माहिती एका आचाऱ्याने दिली. सर्व कार्यालयांचा विचार केला, तर सरासरी १ लाख लिटर पाण्याचा व्यवसाय होत आहे.

बाटलीत पालिकेचेच पाणी
विशेष म्हणजे स्वत: कोणतीच प्रक्रिया न करता थेट महापालिकेचे पाणी बाटलीत भरून त्यावर हातानेच बूचन ठोकून हे पाणी विकले जात असल्याचे प्रकार अनेकांना माहीत आहे. अन्न औषध प्रशासनाने कारवाई करून हे प्रकार उघडकीसही आणले आहेत. तरीही बाटलीबंद पाण्याचाच आधार लोकांना घ्यावा लागत आहे. मावळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेऊन अथवा बाटलीबंद पाणीविक्रीचे धंदे वाढले आहेत.

शहरातील मागणी
शहरात दर दिवसाला घरगुती ग्राहकांकडून सरासरी ५ लाख लिटर पाण्याची मागणी असते. हॉटेल व्यावसायिकांकडून ५ लाख, रेल्वे, बस, खासगी वाहतूक प्रणालीतील प्रवाशांकडून ८ लाख लिटर, उद्योग व्यवसाय आणि खासगी कार्यालयांमध्ये ७ लाख लिटर विचार करता ही एकूण २५ लाख लिटर पाण्याची मागणी आहे. लिटरमागे सरासरी ८ रुपयांचा दर ग्राह्य धरला, तरी दिवसाला २ कोटी रुपयांचा गल्ला जमतो. सहा महिन्यांत मागणी अधिक असल्याने या काळातच ३६० कोटी रुपये होतात. उर्वरित सहा महिन्यांत कमी मागणी असल्याने ४० कोटी रुपयांचा व्यवसाय होत असल्याची माहिती एका डिलरने ‘लोकमत’ला दिली.

मंगल कार्यालयांत नासाडी
सध्या लग्नसराईत लहान बाटल्यांमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. जेवण करणाऱ्यामागे दुसरा वाट पाहत उभा असतो. जेवणासाठी घाई झाल्याने जेवण उरकून एखादा घोट पाणी पिल्यावर संपूर्ण बाटलीतील पाणी फेकून दिले जाते. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. गरज नसतानाही बाटलीबंद जादा पाण्याचा भुर्दंड सोसण्याची वेळ वधुपित्यावर येऊन त्यामुळे व्यावसायिकांचा धंदा जोमात चालल्याचे चित्र आहे.

Web Title: Business of 'Mineral Water' at Fospa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.