भाषांतरातील व्यवसायसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:06+5:302021-03-18T04:10:06+5:30

भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर, त्यातील आशय जसाच्या तसा ठेवून, दुस-या भाषेत आणणे. मूळ लेखनातील संदर्भ, विषय, अर्थछटा लक्षात ...

Business opportunities in translation | भाषांतरातील व्यवसायसंधी

भाषांतरातील व्यवसायसंधी

Next

भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर, त्यातील आशय जसाच्या तसा ठेवून, दुस-या भाषेत आणणे. मूळ लेखनातील संदर्भ, विषय, अर्थछटा लक्षात घेऊन तो मजकूर तितक्याच रोचक पद्धतीने दुस-या भाषेत अनुवादित करणे म्हणजे भाषांतर. त्यासाठी दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व असणे आवश्यक आहे. ज्यांची अशी भाषांवर पकड आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी वाट पाहत आहेत. उदा. जाहिरात क्षेत्र.

जाहिरात क्षेत्रात इंग्रजीतून आणि हिंदीतून मराठीत (किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये) चांगला अनुवाद करणाऱ्यांची गरज आहे. जाहिरातीचा मजकूर लहान, आटोपशीर असला तरी तो ग्राहकाला नेमका भिडणारा, अचूक असायला हवा. कित्येकदा मराठीत नीट भाषांतरित न झालेल्या जाहिराती, निवेदने, सार्वजनिक सूचना या त्यातल्या चुकांमुळे अर्थशून्य एवढेच नव्हे तर हास्यास्पदही ठरतात. कारण भाषांतरकाराला मूळ शब्दांचा अर्थ, संदर्भ नीट कळलेला नसतो.

दुसरे क्षेत्र म्हणजे वित्तसंस्था, आस्थापना, उद्योजक यांचे माहिती-साहित्य, प्रकल्प अहवाल इंग्रजीतून मराठीत करणे. या सामग्रीत वरकरणी लालित्य नसते. पण तंत्रज्ञान, अर्थव्यवहार, तार्किकता, वस्तुनिष्ठता यांना प्राधान्य असते. विषयाचे गांभीर्य असते. यातली भाषा गुंतागुंतीची, फारशी परिभाषायुक्त नसते, मांडणी मुद्देसूद असते. ही कामे त्या त्या संस्थेमार्फत मिळू शकतात. काही गृहपत्रिका (हाऊसजर्नल) असतात. त्यातील लेख इंग्रजीतून मराठीत आणायचे असतात.

समाजमाध्यमे आणि दृकश्राव्यता यांच्यामुळे तर भाषाप्रेमी तरुणांना आजकाल आणखी काही उद्योग स्वत:हून करता येतील. उदाहरणार्थ, छोट्या माहितीपटांचे अनुवाद, डबिंग, इत्यादी. मग त्यांचे विषय पाककृतींपासून मंगळावर यान सोडणे इथपर्यंत कोणतेही असू शकतात. शिवाय निसर्गनिरीक्षण, पर्यावरण, नामवंत व्यक्तींचे विशेष दिन या निमित्ताने अन्य भाषेतील मजकूर मराठीत आणता येईल.

सध्याच्या काळात मागणी आहे ती सकारात्मक जीवनाविषयी भाष्य करणाऱ्या साहित्याला हे लेखन म्हणजे उत्तरे असतील किंवा छोटेखानी पुस्तके. त्यांचा शोध घेऊन दैनंदिन व्यवहारभाषेत या लेखनाचा अनुवाद केल्यास त्याला चांगली मागणी आहे.

याशिवाय भाषांतराचा मोठा प्रांत म्हणजे आपण जी सर्व प्रकारची उपकरणे, गॅझेट्स, औषधे, सौंदर्यप्रसाधने वापरणे त्यांची, त्यासोबत येणारी माहितीपत्रके, तिथे ग्राहकाला चटकन कळेल. असा साध्या सोप्या भाषेतला बिनचूक अनुवाद हवा असतो. त्यात तांत्रिक माहितीवर भर कमी असतो. भाषांतराचे क्षेत्र अमर्याद आहे. ललित साहित्याचे अनुवाद करावे तितके थोडेच आहेत; पण नित्योपयोगी जीवनव्यवहाराचे क्षेत्र त्याहून मोठे आहे.

भाषांतरकौशल्य हस्तगत करता येईल, असे छोटे अभ्यासक्रम आपल्याकडे नाहीत, पण त्यामुळे ना उमेद न होता एखादा जाणकार, अनुभवी भाषांतरकारांकडून मार्गदर्शन घ्यावे आणि सराव मात्र भरपूर करावा. वाचन वाढवावे, शब्दसंग्रह वाढवावा. एकंदरच आपल्या भाषेचा वापर आणि निरीक्षण डोळसपणे केल्यास अनुवादात खूप संधी आपण निर्माण करू शकतो. त्यासाठी एका भाषेतला आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेण्याची तळमळ मात्र पाहिजे.

- डॉ. विजया देव, ज्येष्ठ भाषा अभ्यासक

Web Title: Business opportunities in translation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.