शनिवार-रविवारीही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी : व्यापारी महासंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:02+5:302021-07-02T04:09:02+5:30
पुणे : नोकरी करणाऱ्यास अथवा प्रोफेशनल व्यक्तीस सायंकाळी ५ वाजण्याच्या अगोदर खरेदी करण्याची संधी मिळत नाही व सायंकाळी ४ ...
पुणे : नोकरी करणाऱ्यास अथवा प्रोफेशनल व्यक्तीस सायंकाळी ५ वाजण्याच्या अगोदर खरेदी करण्याची संधी मिळत नाही व सायंकाळी ४ वाजता दुकाने बंद झाल्यामुळे आमच्या व्यवसायामध्ये फार मोठे नुकसान होत आहे. त्यातच शनिवार, रविवार या दिवशी संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे व्यापारावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने, व्यापाऱ्यांना शनिवार-रविवारसह आठही दिवस सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी़, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे़
याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सरचिटणीस महेंद्र पितळीया यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, महापौर आदींना निवेदन पाठवून, व्यापाऱ्यांची बाजू मांडली आहे़
मार्च २०२० पासून जून २०२० पर्यंत अनेक महिने दुकाने बंद राहिली. त्यामुळे व्यवसाय कमी होऊन तो ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला. दीपावलीच्या कालावधीत व्यवसाय वाढण्यास सुरू होतानाच परत अनेक निर्बंध लावले गेले. त्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक स्थिती खालावली गेली आहे. त्यातच सध्याच्या आदेशानुसार दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास व शनिवार, रविवार यादिवशी संपूर्णपणे बंद ठेवण्यामुळे आठवड्यामधील फक्त २ दिवसच व्यवसाय करण्यास संधी मिळत आहे.
--------------------------
नागरिक सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत कधीही, कोणीही अत्यावश्यक वस्तू सोडता इतर वस्तू खरेदीसाठी बाहेर पडत नाही़ त्यातच दुकाने सकाळी १० वाजता उघडली जातात व दुपारी ४ वाजता बंद केली जातात. म्हणजे फक्त ६ तासच व्यवसाय करण्यास मिळत आहेत़ परिणामी नवीन नियमामुळे आठवड्यातील साडेपाच दिवस व्यवसाय बंद राहत आहे़ यामुळे व्यापाऱ्यांना दीड दिवसच व्यवसाय करण्यास मिळत आहे़ त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून व्यापाऱ्यांना आठवड्यामधील ७ दिवस म्हणजे सोमवार ते रविवार पुणे शहरामधील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तूंची सोडून) सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, असे महासंघाने सांगितले आहे.
----------------------------