फायनान्स कंपनीतील घोटाळ्यामुळे व्यावसायिकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 03:16 PM2018-02-25T15:16:00+5:302018-02-25T15:16:00+5:30
भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती.
पुणे : भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद लक्ष्मण फाळके (वय ५७, रा. अमर कॉटेज, भोसलेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर शिवाजी जाधव आणि सुनील गोसावी अशी गुन्हा दाखल झालेल्या त्यांच्या भागीदारांची नावे आहेत.
याप्रकरणी अक्षय अरविंद फाळके (वय २८, रा. भोसलेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांनी शिवाजी जाधव व सुनील गोसावी यांच्याबरोबर २०११ मध्ये सौदामिनी फायनान्स ही कंपनी हडपसर येथील वैशाली हाईटसमध्ये सुरू केली. त्याबरोबर या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी चीटफंडही सुरू केला. चीटफंड व फायनान्स कंपनीसाठी त्यांनी नातेवाईक व इतरांकडून ठेवी घेतल्या होत्या. त्यात जाधव, गोसावी व अन्य दोघांनी ६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा करून ते पैसे दोघांनी स्वत: साठी वापरले. आॅगस्ट २०१६ पासून हा प्रकार सुरू होता. सध्या बँकांची फसवणूक केल्याच्या घोटाळ्यांची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे आता या गुंतवणूकदारांचे पैसे कोठून द्यायचे याबाबत अरविंद फाळके यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला. तसेच त्या चौघांना त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. यामुळे अरविंद फाळके हे प्रचंड मानसिक दबावात होते. शुक्रवारी ते सौदामिनी फायनान्सच्या कार्यालयात आले. त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला. त्यानंतर त्यांनी मी झोपतो, असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले. काही वेळाने साडेतीनच्या सुमारास गोळी झाल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून कार्यालयातील लोक त्यांच्या केबिनमध्ये गेले. तेव्हा फाळके हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून छातीत गोळी झाडून घेतली होती. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
शिवाजी जाधव व सुनील गोसावी हे त्यावेळी एका लग्नासाठी कर्नाटकला केले होते. त्यांना ही बाब समजल्यावर ते फरार झाले आहेत. अक्षय फाळके यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड अधिक तपास करीत आहेत.