बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:58 AM2019-02-04T01:58:40+5:302019-02-04T01:58:55+5:30

सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

businessmen briefly escaped from Leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत

बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत

Next

जुन्नर - सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यातच जुन्नर येथील उद्योजक गुरुनाथ चव्हाण यांनी ऐनवेळी प्रसंगावधान दाखविल्याने ते बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले.

बिबट्याच्या हल्ल्यापासून पळ काढताना भीतीने तोंडातून मदतीसाठी आवाजदेखील बाहेर पडत नव्हता. अशा वेळी शेताच्या परिसरात असलेल्या सात-आठ भटक्या कुत्र्यांना बिबट्याची चाहूल लागल्याने त्यांनी एकत्रितपणे बिबट्यावर आक्रमकपणे भुंकणे सुरू केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर चव्हाण यांनी जखमी अवस्थेत एका हाताने गाडी चालवीत जुन्नर येथे येऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. बिबट्या आपल्यावर आता हल्ला करणार, हे ध्यानात आल्यावर शिताफीने हल्ला चुकविण्यासाठी पळ काढला. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया गुरुनाथ चव्हाण यांनी व्यक्त केली. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर आहे. शेतकरीवर्गाला भीतीपोटी रात्रीचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी चिंतीत आहे. कारण पशुधनावर हल्ले वाढले आहेत.

डाव्या हाताला मार, मनगट मोडले...
गुरुनाथ चव्हाण हे वडज येथील कुलस्वामी खंडेरायाचे मुख्य ठाणे असलेल्या वनविभागाच्या डोंगरालगत असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवर संध्याकाळी गेले असताना फार्महाऊसच्या सीमाभिंतीचे गेट उघडत असताना अवघ्या २० फूट अंतरावर असलेला बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करणार, हे त्यांच्या निदर्शनास आले.
तीन फुटांवरच असलेल्या गाडीचा दरवाजा उघडून त्यात बचावासाठी आसरा घ्यावा, असे चव्हाण यांना वाटले. परंतु भीतीने थरकाप झाल्याने खिशातून गाडीची चावी काढण्यातही त्यांना अपयश आले. परिणामी त्यांनी गेटसमोरून पळ काढला. अंधारात पळत असताना रस्त्यावरील खाचखळग्यात अडखळून ते खाली पडले. यावेळी त्यांचा डावा हात, मनगट मोडले. पायाला तसेच अंगावरही जखमा झाल्या.

Web Title: businessmen briefly escaped from Leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.