घरफोड्या करणाऱ्यांना अटक, 11 लाखांचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:08 AM2018-08-31T02:08:37+5:302018-08-31T02:09:06+5:30
२० गुन्हे उघड : ११ लाखांचे सोने जप्त; खंडणीवरोधी पथकाची कारवाई
पुणे : कुलूपबंद सदनिका हेरून भरदिवसा घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास करणाºया सराइताला त्याच्या साथीदारासह खंडणीविरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले असून त्याच्याकडून शहरात दाखल असलेले एकूण २० गुन्हे उघडकीस आणले आहेत.
निखिल ऊर्फ माँटी दत्तात्रय कंगणे (वय २४, रा. आनंदनगर, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) त्याचे नाव आहे. तर अमोल रघुनाथ गोपकर (वय २८, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, चिखली) असे त्याच्या अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे. दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहरात हडपसर, चंदननगर, येरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे माळवाडी तसेच निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी ११ लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़ त्याने मागील ३ वर्षात कुलूपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या असून त्यातील १८ गुन्हे भरदिवसा केले आहेत. पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती़ त्यानंतर तो तळेगाव ढमढेरे येथे राहायला गेला होता़ त्यामुळे तो पोलिसांच्या नेहमीच्या चेकिंगमध्ये आढळून येत नव्हता़ त्याने चोरलेले दागिने त्याने घरातील बेडच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी अविनाश मराठे, पांडुरंग वांजळे, रमेश गरूड, उदय काळभोर, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदीप शिंदे, संतोष मते, सचिन कोकरे, धीरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, शिवानंद बोले, हनुमंत गायकवाड, नारायण बनकर, प्रकाश मगर आदीच्या पथकाने केली.
याबाबत पोलीस उपायुक्त
शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी माहिती दिली़
खंडणीविरोधी पथकातील कर्मचारी अमोल पिलाने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निखिल कंगणे हा साथीदारासह सोन्याचे दागिने विकण्यासाठी हडपसरगाव येथील गांधी चौकात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि निखिल व अमोल यांना ताब्यात घेतले.