मी त्या ताईवर उपकार केले नाहीत, फक्त माझं कर्तव्य बजावलं; धाडसी तरुणाच्या विनम्रतेनं मनं जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:24 PM2023-06-28T16:24:51+5:302023-06-28T16:36:36+5:30
सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय
पुणे: प्रेमसंबंध असताना मारहाण केल्याने तिने त्याच्याशी ब्रेकअप केला. त्याच रागातून तरुणाने भरदिवसा सदाशिव पेठेत तिच्यावर कोयत्याने वार करून संपविण्याचा प्रयत्न केला. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे या हल्लेखाेर माथेफिरुचे नाव आहे. परिसरात असणाऱ्या लेशपाल जवळगे आणि त्याचा मित्र हे दोघे हिम्मत दाखवत पुढे आले आणि माथेफिरू तरुणाला पकडले. त्यांनी आणि लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवलेली ही हिम्मत आणि माणुसकीने तरुणीचे प्राण वाचले; मात्र भरदिवसा, भर रस्त्यात अशा प्रकारे वार करण्याची हिम्मत हाेतेच कशी? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे. लेशपालने या थरारक घटनेत शंतनूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या बॅग फेकण्याचे धाडस केले. आणि मग त्याला पकडले. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. अशातच लेशपाल जवळगे याने एक फेसबुक पोस्ट केली आहे.
मी फक्त माझं कर्तव्य बजावलं
''सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय... मी त्या ताईवर उपकार नाहीत केले मी माझं कर्तव्य पार पाडलं ... तरीही सर्वांचे खुप खूप आभार आहेत. तर या घटनेनंतर खूप फोन येत आहेत. सगळे सत्काराला बोलवत आहेत. पण ती घटना घडली, तेव्हा त्या मुलाला पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मी रूमवर गेलो आणि एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला आता सत्काराला बोलावू नका"
लेशपाल हा आडेगाव माढा येथील रहिवासी आहे. मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. मागील ४ वर्षांपासून तो पुण्यात आला आहे. स्पर्धा परिक्षा देण्यासाठी म्हणूनच तो पुण्यात आला. पर्वती पायथ्याला राहतो. अभ्यासिकेत बसण्यासाठी नवी पेठेत येतो. गावी शेती आहे. त्यादिवशी सदाशिवपेठेतून तो चालला होता. त्याच्यासमोरच मुलगी पळते आहे व तिच्यामागे कोयता घेऊन एक मुलगा धावतो आहे असा प्रसंग घडला. त्याने लगेचच पुढे धाव घेत त्या मुलाच्या हातातील कोयत्यासह त्याला धरले. त्यानंतर काही मुले धावत आली व त्यांनीही त्या मुलाला जेरबंद केले. दिल्लीत एका मुलीची हत्या होत असताना बघे काहीही न करता फक्त पहात बसल्याचे दृश्य बघितल्यापासून अशा मुलांविषयी चीड होती व ती या घटनेतून बाहेर आली असे लेशपालने सांगितले.
भरदिवसा, भर रस्त्यावर?
- तरुणी मंगळवारी सकाळी परीक्षा असल्याने बसने ग्राहक पेठ येथे उतरली. त्यावेळी शंतनू समोर होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने तुझ्याशी बोलायचे नाही, आईशी बोल, असे सांगून ती चालत जाऊ लागली. तिने एका मित्राला बोलावून घेतले. ती चालत चालत पेरुगेट पोलिस चौकीजवळील स्वाद हॉटेलजवळ आली. तोपर्यंत तेथे तिचा मित्र दुचाकीवरून आला. ती त्याच्या दुचाकीवरून जाऊ लागताच शंतनूने तिचा हात धरून ‘माझे ऐक नाही तर तुला आज मारुनच टाकतो, आज एकतरी मर्डर करतोच’, अशी धमकी दिली.
- तरुणाने दिलेली धमकी ऐकून तिच्या मित्राने दुचाकी थांबविली. तो गाडीवरुन उतरला. तोपर्यंत शंतनू याने त्याच्याकडील बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवून तो पळाला. त्यानंतर शंतनूने आपला मोर्चा तरुणीकडे वळविला. हे पाहून ती पळून जाऊ लागली. तो तिच्या मागे कोयता घेऊन धावू लागला. तिच्या डोक्यात तो वार करणार, तितक्यात तिचा पायात पाय अडकून ती खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला निसटता वार लागला.
- त्यानंतरही शंतनूने तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तिने हात मध्ये घातल्याने हाताच्या मनगटाला लागला. शंतनूला ढकलून ती पळू लागली. तेव्हा लेशपाल आणि लोक जमली. तेव्हा त्याने त्यांच्यावर कोयता उगारला. तरीही त्यातील काही जणांनी त्याला पकडले. लोकांनी त्याला बेदम चोप दिला. तिला पोलिस चौकीत नेले. तेथून रुग्णालयात दाखल केले.
तरुणांची मदत
अनेकदा रस्त्यावर कोणी हल्ला केला तर लोक बघ्याची भूमिका घेतात. काही जण व्हिडीओ करतात. एमपीएससी करणारे तरुण या परिसरात असतात. ते बघ्याची भूमिका न घेता तरुणीच्या मदतीला धावले म्हणून ती माथेफिरुच्या तावडीतून वाचू शकली.