...पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार? आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, पुण्यात झळकले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 01:11 PM2023-02-19T13:11:57+5:302023-02-19T13:12:09+5:30
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर लावलेल्या या पोस्टरमुळे चांगलीच चर्चा रंगली
पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्काच बसला आहे. त्यानंतर राजकारकरणात वातावरण ढवळून निघाले आहे. तर पुण्यातील धनकवडी भागात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ धनकवडीमध्ये पोस्टर झळकले..
'सगळं चोरलं पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ? असा सवाल या पोस्टरवर लावला आहे. 'आम्ही कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत' असा मजकूर यामध्ये लिहिला आहे कृणाल धनवडे यांनी धनकवडी भागात ठाकरेंच्या समर्थनार्थ हे पोस्टर लावले आहेत. विशेषतः आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर लावलेल्या या पोस्टरमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवेसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर आयोगाने अखेर निकाल दिला. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.