लोणी काळभोरला गाडीची काच फोडण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:41+5:302021-01-16T04:14:41+5:30
आज दुपारी परगावातून बोगस मतदार आणले या संशयावरून एका चारचाकी गाडीची काच फोडण्याचा प्रकार लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळेसमोर ...
आज दुपारी परगावातून बोगस मतदार आणले या संशयावरून एका चारचाकी गाडीची काच फोडण्याचा प्रकार लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळेसमोर घडला. निवडणुकीपुर्वी दोन पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण झाले असल्याने तणावाचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटांतील गुन्हा दाखल असलेल्या २४ जणांना पोलिसांनी नोटीस देवून सोमवार (१८ जानेवारी) रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याचे हद्दीत येण्यास बंदी घातली असल्याने तणावात थोडी शिथिलता आली होती. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज दुपारी लोणी काळभोर येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली.
आज पूर्व हवेलीत लोणी काळभोर (६७ टक्के), थेऊर (८० टक्के), कुंजीरवाडी (८६ टक्के), आळंदी म्हातोबाची (८२ टक्के), सोरतापवाडी (७५ टक्के), उरुळी कांचन, (६६ टक्के), कोरेगाव मूळ (८१ टक्के), शिंदवणे, (८७ टक्के), वळती (८५ टक्के ), भवरापूर (९० टक्के) झाले.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये उमेदवारांनी निवडणूक चिन्ह मिळाल्यापासून प्रचाराला सुरुवात केली.पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड देण्यात आल्यामुळे प्रचाराची रंगत वाढली होती. सर्वच पॅनेल प्रमुख व अपक्ष उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे मोठ्या प्रमाणांत पैशांचा वापर करून मतदारांस खूश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आज मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मताचे दान आपल्याला मिळावे यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व त्याचे कार्यकर्ते सकाळपासूनच धावपळ करताना दिसत होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणांत खासगी गाड्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश मतदान केद्रांवर रांगा लागल्याचे आढळून आले. अपंग व वृध्द मतदारांनाही आणण्यामध्ये चढाओढ लागली होती. सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली त्यावेळीही मतदारांना आणण्याचा सपाटा चालूच होता. मतदान संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपणच बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आपल्या कर्मचा-यांचा योग्य बंदोबस्त लावल्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.
1) लोणी काळभोर येथील मतदान केंद्रावर मतदारांनी लावलेली रांग.
2) मतदानासाठी चाललेली वृद्ध महिला.