लोणीकाळभोरला वाळूमाफियांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:12+5:302021-06-25T04:10:12+5:30
लोणी काळभोर : रॉयल्टी न भरता वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करणाऱ्या दोन ट्रकवर महसूल विभागाने कारवाई करत ...
लोणी काळभोर : रॉयल्टी न भरता वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करणाऱ्या दोन ट्रकवर महसूल विभागाने कारवाई करत एकूण १४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना बुधवारी (दि. २३) घडली. ही कारवाई हवेली तहसीलदार यांनी केली.
मंडल अधिकारी उरुळी कांचन दीपक चव्हाण, तलाठी निवृत्तीनाथ गवारी, प्रदीप जवळकर तसेच कोतवाल सुरेश शेलार यांचे पथक पुणे - सोलापूर महामार्गावर पाहाणी करत होते. या वेळी त्यांना सोरतापवाडी (ता. हवेली) येथील गट नं. १५८ मध्ये रात्री ८ च्या सुमारास दोन वाळूने भरलेले ट्रक दिसले.
पथकाने जवळ जावून पाहणी केली असता त्या दोन्ही ट्रकच्या मागील हौदात प्रत्येकी ५ ब्रास वाळू भरलेली होती. व ती वाळू धुण्याचे काम चालू होते. ट्रक चालकांस वाळूची शासनास रॉयल्टी रक्कम भरलेली पावती व वाहतूक परवाना मागितला. त्यावर त्या दोघांनी वाहतूक परवाना व रॉयल्टी भरलेली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते दोघे अवैधरीत्या अनधिकृतपणे उत्खनन करून काढण्यात आलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी वाळू धुवत असल्याची पथकाची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी १० ब्रास वाळूसह २ ट्रक असा एकूण १४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही ट्रकचे मालक बंडू विठ्ठल सुरवसे (वय २९) व ट्रकचालक तात्या शिंदे (वय ३०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या ट्रकचा चालक महसूल पथकाला पाहताच पळून गेला आहे.