पाचगाव वन क्षेत्रातात फुलपाखरू उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:10+5:302021-03-23T04:11:10+5:30
पुणे : पाचगाव पर्वती येथील (तळजाई) राखीव वनातील फुलपाखरू वन उद्यान व लाकडी निरीक्षण कुटीचे उद्घाटन वन ...
पुणे : पाचगाव पर्वती येथील (तळजाई) राखीव वनातील फुलपाखरू वन उद्यान व लाकडी निरीक्षण कुटीचे उद्घाटन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते झाले. यावेळी मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक राहुल पाटील,नगरसेवक सुभाष जगताप, तसेच पाचगांव पर्वती ट्रेकर्स व स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
तळजाई वन उद्यानासाठी 13 कोटी निधीचे विकास आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली असून १३ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये निधी प्राधान्याने मंजूर करुन कामास सुरुवात करण्याबाबत वनमंत्र्यांनी सूचना दिल्या. यामुळे तळजाई वन उद्यानामध्ये निसर्गाचा समतोल साधून वनउद्यानातील पर्यटकांचे सोयीसाठीची कामे करणे सोपे होणार आहे.
भरणे म्हणाले, ‘‘शहराचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीसाठी जे जे आवश्यक असेल, त्यासाठी सर्व प्रयत्न करून त्याचा पाठपुरावा करू. तळजाई टेकडीसाठी ‘सीएसआर’ फंडातून विकासकामे करणेबाबत प्रयत्न करण्यात येतील. तसेच राखीव वनात भटके व इतर कुत्र्यांमुळे वन्यप्राणी जसे – ससा , मोर यांवर होणा-या हल्ल्यांबाबत योग्य उपाययोजना केल्या जातील.
बांबू वस्तू केंद्राचेही उद्घाटन
वनराज्यमंत्री यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले बांबू वस्तू विक्री केंद्र, सेनापती बापट रोड, पुणे याचे उद्घाटन झाले. सावित्रीबाई फुले बांबू वस्तू विक्री केंद्र, हे पुणे शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असून या माध्यमातून वन विभागाच्या वन उपज जसे- बांबू व त्यापासून तयार केलेल्या वस्तू यांची विक्री करण्यात येणार असून या वस्तू या आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी बांधव, संयुक्त वनव्यवस्थापन समिती व इतर महिला बचत गट यांना रोजगार निर्मितीचे दृष्टीने वन विभाग एक साधन उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून आदिवासी बांधव व इतरांचे व्यवसायाला चालना मिळेल.