Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:36 IST2021-10-07T17:20:12+5:302021-10-07T19:36:41+5:30
सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत.

Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू'
श्रीकिशन काळे
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाचा आवार जैवविविधतेचे संपन्न असा आहे. त्यामुळे येथे फुलपाखरांच्या अनेक प्रजाती दिसून येतात. सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यासाठी महिनाभर दररोज अर्धा तास फुलपाखरांची नोंद करण्यात येत होती. यामध्ये जगातील सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल पहायला मिळाले.
दर वर्षीचा सप्टेंबर महिना हा बटरफ्लाय मंथ म्हणून भारतात साजरा केला जातो. भारतातील फुलपाखरू निरीक्षकांनी फुलपाखरांच्या नोंदी साठी एकत्र येऊन सप्टेंबर महिना हा फुलपाखरू महिना म्हणून साजरा करायचा असे ठरले आहे. फुलपाखरांवरती काम करणाऱ्या ३० विविध संस्था एकत्र येऊन हा महिना एखाद्या सणाप्रमाने साजरा करतात. महिनाभर फुलपाखरांची छायाचित्रे काढून Inaturalist, ifoundbutterflies आणि Indian biodiversity portal अश्या संकेतस्थळांवर प्रत्येकजण आपल्या नोंदी टाकतात. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘लेट्स काऊंट बटरफ्लाय’ या संपूर्ण महिनाभर चाललेल्या या उपक्रमात पर्यावरण शास्त्राचा विद्यार्थी आणि फुलपाखरू प्रेमी रजत जोशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एकूण ४४ प्रजातींची नोंद एका महिन्यात केली आहे. या संपूर्ण उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी यांनी आणि पर्यावरण शास्त्र विभागप्रमुख डॉ. रूपाली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
कसे होते गणनेचे स्वरूप
- दररोज अर्धा तास महाविद्यालयाच्या परिसरातील एका भागात जाऊन फुलपाखरांची नोंद करायची.
- या पद्धतीत महाविद्याल्यातील परिसरात एका विशिष्ट वाटेवर जाऊन नोंद. यात एकेरीच पाहणी केली.
दुर्मीळ प्लेन पफिनची नोंद
महाराष्ट्र राज्य फुलपाखरू सर्वेक्षणामध्ये कॉमन ग्रास यलो, एमिग्रेंट, पामफ्लाय, वंडरेर, ब्लू मोरमॉन यांची नोंद आहे. पुणे शहरात दुर्मिळ असे plain puffin फुलपाखरू पण ह्या सर्वेक्षणात आढळून आले.
महाविद्यालयात मुबलक आवडते खाद्य
फर्ग्युसनमध्ये टणटणी म्हणजे लॅन्टेना ही वनस्पती असून, ही फुलपाखरांची सर्वात आवडती आहे. ती मुबलक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रजाती दिसून आल्या. शिवाय महावदियालयाच्या परिसरात palm, casia tora ( टाकळा), एरंड, कन्हेर, पानफुटी अश्या काही खाद्य वनस्पती सुद्धा आहेत.