लोणी भापकरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, ४१ हजार व साडेचार तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:30 AM2017-10-20T02:30:47+5:302017-10-20T02:30:56+5:30
लोणी भापकर (ता. बारामती) गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यालगत असणा-या अण्णासो सोपाना गोलांडे कुटुंबीयाच्या घरावर अज्ञात ७ दरोडेखोरांनी बुधवारी (दि.१८) रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडा टाकून धुमाकूळ घातला.
मोरगाव : लोणी भापकर (ता. बारामती) गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यालगत असणा-या अण्णासो सोपाना गोलांडे कुटुंबीयाच्या घरावर अज्ञात ७ दरोडेखोरांनी बुधवारी (दि.१८) रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडा टाकून धुमाकूळ घातला. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दरोडेखोरांनी रोख ४१ हजार व साडेचार तोळ्यांचा सोन्याचा ऐवज तसेच घराशेजारील वोडाफोनच्या कंपनीच्या मनोºयाच्या १९ बॅटरी चोरी केल्याची घटना घडली .
लोणी भापकर या गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यावर गावापासून एक किमीच्या अंतरावर शेतात अण्णासो गोलांडे यांचे घर आहे.
पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडेखोरांच्या टोळीने घरामध्ये दहशत पसरवली होती. घरामध्ये अण्णासो सोपाना गोलांडे, कुसुम अण्णासो गोलांडे, स्वाती प्रवीण गोलांडे, सुरेखा सुभाष जाधव होते.
शिवराज प्रवीण गोलांडे व पृथ्वीराज प्रवीण गोलांडे या लहान मुलांच्या गळ्याला सुरा लावत घरात सोने, नाणे, रोकड कोठे आहे, याची विचारपूस दरोडेखोर करीत होते.
स्वाती गोलांडे यांना मारहाण केली. शेजारील वोडाफोन कंपनीच्या मनोºयाच्या १९ बॅटरी काढून नेण्यात आल्या. दरम्यान सुमारे चार तास घरातील प्रत्येक वस्तूची उलथापालथ त्यांनी केली.
स्वातीने रात्री ३ वाजता पोलिसांची गाडी येते, असे सांगितल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींना दोरीने ने बांधून दरोडेखोर पसार झाले.
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांनी भेट घेतली. सदर ठिकाणी श्वानपथकासह पाचारण करण्यात आले होते.
संबंधित घटनेची माहिती समजताच पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी घटनास्थळी भेट देऊन गोलांडे कु टुंबीयांना आधार दिला.
उपचारासाठी जमवलेली रक्कम गेली...
प्रवीण गोलांडे यांचा अपघात झाला असल्याने व सदर कुटुंब गरीब असल्याने लोणी भापकर गावातील ग्रामस्थांनी मुलाच्या उपचारासाठी सुमारे ४१ हजार रुपये वर्गणी जमा करून सदर कुटुंंबीयांना दिले होते.
हे पैसे तसेच चाडेचार तोळे सोनेही लुटून नेले. यामुळे देवकाते यांनी संबंधित कुटुंबीयांना ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. तसेच अपघात झालेल्या मुलास ससून अथवा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे आश्वासन दिले.