मंचरला थेट बांधावरच आंब्याची खरेदी!
By Admin | Published: June 15, 2015 05:59 AM2015-06-15T05:59:18+5:302015-06-15T05:59:18+5:30
आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. या शेतकऱ्यांची आंबा खरेदी थेट शेताच्या बांधावर होत असल्याने
मंचर : आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. या शेतकऱ्यांची आंबा खरेदी थेट शेताच्या बांधावर होत असल्याने, तसेच त्यांच्या समोरच वजन, रोख पैसे हातात मिळत असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रथमच चांगला नफा मिळू लागला आहे.
आंबेगाव तालुक्यात आंबा सिझन चांगला होतो. पश्चिम पट्टा तर मिनी कोकण म्हणून ओळखला जातो. यापूर्वी व्यापारी थेट शेतकऱ्याच्या शेतात येऊन झाडाची उक्ती खरेदी करायचे, आंब्याची बाग आहे त्या स्थितीत सौदा करून व्यापारी घेत. यात व्यापारी मात्र मालामाल होत, तर शेतकऱ्यांच्या हातात खूपच कमी पैसे राहात होते. मागील वर्षापासून चित्र बदललेले आहे. मंचर शहरातील अभिनव आंबा खरेदी केंद्राकडून आंब्याची शेतावरील बांधावर जाऊन खरेदी केली जाते. त्यासाठी आमोंडी, गंगापूर, पारुंडे येथे, तसेच मंचर शहरात आंब्याची खरेदी केली जाते.
उंच आंब्याच्या झाडावरील आंबे काढताना अनेकदा शेतकरी जखमी होतात. असे प्रकार होऊ नये यासाठी आंबा काढण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या खुडचा शेतकऱ्यांना पुरविण्यात आल्या आहेत. या खुडच्यांनी आंबे काढून शेतकरी क्रेटमध्ये आणतात. तेथे इलेक्ट्रीक काट्यावर आंब्याचे वजन करून प्रत ठरवली जाते. छोटे व डाग लागलेले आंबे सुद्धा स्वीकारले जातात. शेतकऱ्यांना समोरच हिशोब करून रोख पैसे दिले जातात.
हापूस, देवगड, राजापुरी, केशर हे आंबे येथे विक्रीस येतात. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, दलाली, पॅकिंग हा सर्व खर्च वाचतो. शेतकऱ्यांना आता आंब्याचे अनेक पटीने जास्त पैसे मिळू लागले आहेत. हा सर्व माल मुंबई येथील मल्हार बाबूराव बेंडे यांच्या दुकानावर पाठविला जात असल्याची माहिती बाबासाहेब बेंडे व सतीश बेंडे यांनी दिली. आतापर्यंत १५ ट्रक माल पाठविण्यात आला आहे. दहा दिवस ही खरेदी जोरात सुरू राहणार आहे.
(वार्ताहर)