सोने खरेदी विक्रीतून नफा मिळवून देतो; आमिष दाखवत ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Updated: July 17, 2024 15:42 IST2024-07-17T15:42:14+5:302024-07-17T15:42:48+5:30
सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ज्येष्ठाचा विश्वास संपादन केला

सोने खरेदी विक्रीतून नफा मिळवून देतो; आमिष दाखवत ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक
पुणे: सोने खरेदी-विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरूड परिसरातील यश एलिना बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. मयूर फडके (रा. बंधुप्रेम सोसायटी, कर्वेनगर) असे आरोपीचे नाव आहे.
एरंडवणे परिसरात राहणाऱ्या अशोक चुनीलाल कटारिया (६४) यांनी मंगळवारी (दि. १६) अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर फडके याच्यावर फसवणुरीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर व फिर्यादी यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख झाली. त्यावेळी मयूर याने सोने-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना सोने खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. मयूर याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपीला २० लाख रुपये रोख स्वरुपात दिले.
पैसे घेतल्यानंतर मयूर फडके याने फिर्यादी यांना नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. फिर्यादी यांनी वारंवार पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कटारिया यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोकडे करत आहेत.